बायो-बबलला कंटाळून ख्रिस गेलची आयपीएलमधून माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब किंग्ज संघाचा स्टार खेळाडू ख्रिस गेलने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या लढतीपूर्वी आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. बायो-बबलला पंटाळून आपण हा निर्णय घेतल्याचे ख्रिस गेलने सांगितले. कॅरेबियन प्रीमियर लीग खेळल्यानंतर ख्रिस गेल लगेच आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी यूएईला आला होता.

‘‘मागील काही महिन्यांपासून मी बायो-बबलमध्ये आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी ताजेतवाने होण्यासाठी मला विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला. मला स्पर्धा सोडण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल पंजाब किंग्जचे आभार. आगामी लढतींसाठी पंजाब संघाला शुभेच्छा!’’ -ख्रिस गेल

जूनपासून बायो-बबलमध्ये

वेस्ट इंडीजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस गेल जूनपासून बायो-बबलमध्ये आहे. सुरुवातीला मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत ख्रिस गेल खेळला. त्यानंतर सीपीएल स्पर्धेसाठी त्याला बायो-बबलमध्ये रहावे लागले. त्यानंतर लगेच त्याला आयपीएलसाठी यूएईमध्ये यावे लागले. आयपीएल संपल्यानंतर टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळायची आहे. त्यामुळे टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ताजेतवाने राहण्यासाठी ख्रिस गेलने अखेर आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला.