
कोरोनामुळे या वर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्ड कप आता 2022 सालामध्ये ढकलण्यात आला आहे. 2021 सालामध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कप हा नियोजित वेळेनुसार हिंदुस्थानातच होणार आहे. आयसीसी व बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत घोषणा गुरुवारी करण्यात आली. हिंदुस्थानात होणाऱया प्रतिष्ठेच्या स्पर्धेत 16 संघ जेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावणार आहेत. पुढील वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार असल्यामुळे 12 महिन्यांआधी या स्पर्धेचे बिगुल वाजवण्यात आले. याप्रसंगी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली, सेक्रेंटरी जय शहा व आयसीसीचे मनू एस यांची उपस्थिती होती.
आयोजनाचा मान हा तर सन्मानच
हिंदुस्थानात पुढल्या वर्षी टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आयोजित करण्याचा मान आपल्याला मिळाला ही खरोखरच सन्मानाची बाब आहे. 1987 सालापासून जागतिक क्रिकेटमधील अव्वल स्पर्धा हिंदुस्थानात खेळविण्यात आल्या आहेत. त्याला यशही लाभले आहे. यामुळे जगभरातील क्रिकेटपटू हिंदुस्थानात येऊन खेळायला नक्कीच आतुर झाले असतील, असे स्पष्ट मत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी व्यक्त केले. दरम्यान, जय शहा यावेळी म्हणाले, हिंदुस्थानातील वर्ल्ड कप सुरक्षित व यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. – सौरभ गांगुली
या 16 संघांचा सहभाग
हिंदुस्थानात होणाऱया टी-20 वर्ल्ड कपमध्ये 16 संघांचा सहभाग असणार आहे. या मानाच्या स्पर्धेत हिंदुस्थानसह ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलॅण्ड, पपूआ न्यू जिनीया, आयर्लंड, नामिबीया, स्का@टलंड व ओमान या देशांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.
तारखा अद्याप निश्चित नाहीत
हिंदुस्थानात होणारा टी-20 वर्ल्ड कप हा 2021 सालामधील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे हे निश्चित झाले असले तरी या स्पर्धेच्या तारखा अद्याप ठरवण्यात आलेल्या नाहीत. तसेच हिंदुस्थानात 2016 सालानंतर आयसीसीकडून आयोजित करण्यात येणारी स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. 2016 सालामध्ये हिंदुस्थानात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडीजने बाजी मारली होती.
























































