24 तासांत चीनी 45 विमाने आणि 6 नौदलजहांचा घेराव; तैवानचा दावा

चीन आणि तैवानमधील संबंध तणावपूर्ण झाले असून, तैवानने शी जिनपिंग सरकारवर गंभीर आरोप केला आहे. तैवानच्या हवाई क्षेत्रात 45 चिनी लष्करी विमाने आढळून आल्याचा दावा तैवान केला आहे.

गेल्या 24 तासांत तैवानच्या हवाई क्षेत्रात 45 चिनी विमाने आणि सहा नौदलाची जहाजे आढळून आली आहेत. तैवान सरकारने जाहिर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिनी विमानाने तैवान सामुद्रधुनीची मध्यरेषा ओलांडली असल्याने तैवानेचे संपूर्ण लक्ष चिनी कारवायांवर आहे.

तैवान हे चीनच्या दक्षिण – पूर्व किनाऱ्यापासून 100 मैल अंतरावर स्थित असलेले एक लहान बेट आहे. एकेकाळी हे बेट चीनच्या ताब्यात होते. त्यावेळी त्यास फॉर्मोसा बेट या नावाने संबोधले जात असे. मात्र 1949 मध्ये ते वेगळे झाले. चीनचे नाव पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना आणि तैवानला रिपब्लिक ऑफ चायना असे नाव देण्यात आले. दोन्ही देशांमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

चीन तैवानवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात असून, चीनने कितीही युद्धाच्या धमक्या दिल्या तरीही तैवानवर हल्ला करणे चीनसाठी फायदेशीर ठरणार नसल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे तैवान चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. तेथील हवामानाचा अंदाज, तसेच पर्वत रांगा व समुद्र किनाऱ्याची रचना यामुळे तैवान क्षेत्रात प्रवेश करणे कठीण होऊ शकते.

तैवानकडे प्रगत शस्त्रे असल्याने चीनला तैवानशी युद्ध करणे महागात पडू शकते. त्याचबरोबर तैवानचे अमेरिकेशी असलेले संबंध. अमेरिका नेहमीच तैवानला आपला चांगला मित्र मानत आलीय. तैवानवर हल्ले झाल्यास अमेरिका तैवानला लष्करी मदत करेल असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी जाहीर केले होते. तसेच तैवानमधील सत्ताधारी पक्ष डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी चीनला आपला कट्टर विरोधक मानतात.