क्षयरोग रोखणारे कर्मचारीच वाऱ्यावर, आठ दिवसांत निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत क्षयरोग रोखण्यासाठी काम करणारे पालिकेचे कंत्राटी कर्मचारीच वाऱयावर असल्याचे समोर आले आहे. या कर्मचाऱयांना गेल्या 18 ते 20 वर्षांपासून तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत असून अनेक मागण्याही प्रलंबित आहेत. त्यामुळे या मागण्यांबाबत आठ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने दिला आहे.

मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेत शेकडो कंत्राटी कामगार काम करीत आहेत. या कामगार-कर्मचाऱयांना घरोघरी जाऊन क्षयरोग रुग्णांची भेट घ्यावी लागते. अशा वेळी त्यांच्याकडे महापालिकेचे साधे ओळखपत्रसुद्धा नसल्यामुळे अनेक वेळा काम करताना अडचणी निर्माण होतात. कर्मचाऱयांना क्षयरोग रुग्णालयाच्या अनेक वेळा संपका&त राहिल्यामुळे या कर्मचाऱयांना दीर्घ आजाराला सामोरे जावे लागते. दीर्घ आजार झालेल्या कर्मचाऱयांची रजा मंजूर न केल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे. यामुळे या कर्मचाऱयांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असताना प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी पालिकेच्या ‘एफ/दक्षिण’ वॉर्ड ऑफिसवर चिटणीस संजय वाघ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. क्षयरोग रोखण्याचे काम करताना लागण होऊन मृत्यू झालेल्या कर्मचाऱयांच्या वारसांना दहा लाखांची मदत आणि एका वारसाला पालिकेची नोकरी देण्याची मागणीही करण्यात आली.