लहान मुलांना जपा.. मुंबईत गोवरचा शिरकाव.

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. समीर धर्माधिकारी (बालरोगतज्ञ)

ऋतूबदलानुसार नेहमीप्रमाणे मुंबईत सर्दी, पडसे, ताप, खोकला या विकारांसोबत गोवरनेही शिरकाव केला आहे. आणि आता मुंबईत गोवरच्या उद्रेकाची स्थिती निर्माण झाली आहे. मागील दोन महिन्यात गोवरचे ८४ रुग्ण समोर आले आहेत. महापालिकेकडून गोवरचा उद्रेक असलेल्या विभागात विविध उपाययोजनांना सुरुवात केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी गोवर रुग्णांचे सर्वेक्षण केले जात असून रुग्णांना अ जीवनसत्व देण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास संशयित रुग्णांना पालिका रुग्णालयात उपचारासाठी पाठवले जाते आहे. ९ महिने आणि १६ महिन्यांच्या बालकांसाठी लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे.
गोवर टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण करणे. मूळ लहान असतानाच गोवर लसीचे 2 डोस दिले जातात. लसीकरण झालेल्या मुलांमध्ये गोवर होण्याचे प्रमाण अत्यंत अत्यल्प असते. महानगर पालिका नियमानुसार काळजी घेत असली तरी आपण सतर्क राहून आपल्या मुलांची काळजी घेणे हे प्राधान्याने येते. त्यामुळे गोवर या आजाराविषयी सविस्तर जाणून घेऊया.
गोवर हा विषाणुपासून पसरणारा एक संसर्गजन्य लहान मुलांमध्ये सहज संक्रमित होणारा आजार आहे. काहीवेळा मोठेपणीही गोवर होऊ शकतो. गोवर एकदा झाल्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीला होत नाही.
गोवर आजाराची कारणे – गोवर paramyxo virus च्या संसर्गामुळे होत असतो. शरीरात या विषाणूंची लागण झाल्यानंतर साधारण १० ते १२ दिवसात गोवरची लक्षणे जाणवू लागतात. गोवर झालेल्या व्यक्तीच्या खोकला, शिंका यातून विषाणु हवेत पसरतात.

लक्षणे –

१) सुरुवातीला खोकला, ताप, सर्दी होणे.
2) डोळ्यांची जळजळ
३) डोळे लाल होणे.
४) डोळ्यांना प्रकाश सहन न होणे.
५) घसा दुखणे.
६) तोंडाच्या आतील बाजूस पांढऱ्या रंगाचे ठिपके दिसणे.
७) अशक्तपणा
८) अंगदुखी

गोवरवर विशेष असे उपचार केले जात नाही. रुग्णांत असलेल्या लक्षणांवरून उपचार केले जातात. त्यामुळे या आजारात सर्दी, ताप, खोकला यावरील औषधे देतात. रुग्णाने विश्रांती घेणे आवश्यक असते. द्रव पदार्थ रुग्णाच्या आहारात असावेत. साधारणत: ८ ते १४ दिवसात ताप हळूहळू कमी होऊन पुरळसुद्धा कमी होऊन आजार बरा होतो.

१) बालकांना आवश्यक त्या लसी वेळेवर द्याव्यात.
2) गोवर उठलेल्या रुग्णाच्या संपर्कात जाणे टाळावे.
३) गोवर रुग्णाच्या संपर्कात आल्यास हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
४) दुषित हातांचा स्पर्श आपले तोंड, डोळे, नाक यांना होणार नाही याची काळजी घ्या.

गोवर आणि लसीकरण – MMR लसीमुळे गालगुंड, गोवर, रुबेला या तीन आजारांपासून रक्षण होते. ही लस लहानपणीच दिली तर गोवर होण्याची शक्यता खूप कमी असते.