
आजच्या काळात जवळजवळ प्रत्येक व्यक्ती मानसिक तणावाचा सामना करत आहे. ही स्थिती कमी-अधिक असू शकते, परंतु आज प्रत्येकाच्या जीवनात तणाव आहेच. यावर वेळीच उपाय शोधला नाही, तर भविष्यात मानसिक विकारही होऊ शकतो. तणाव कमी करण्याकरिता काही उपायांचा आपल्या नित्यक्रमात समावेश करणे फायदेशीर ठरते.
काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींवरही ताण घ्यायची सवय असते. अशा प्रकारे ताण येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तणावाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर दीर्घ श्वासोच्छवासाने नियंत्रण ठेवता येते. या उपायामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. याशिवाय इतर मानसिक ताणतणावही वाढण्यापासून रोखता येतील.
दीर्घ श्वासोच्छवास घेण्यासाठी एका ठिकाणी आरामदायी स्थितीत शांतपणे बसा. त्यानंतर खोल श्वास घ्या. 5 सेकंद दीर्घ श्वास घ्या. 2 सेकंद श्वास धरून ठेवा. नंतर 5 सेकंद श्वास सोडा. हा तणाव कमी करण्याचा एक चांगला मार्ग आहे.
इतर काही उपाय
– ताणतणाव दूर करण्यासाठी, इतरांमध्ये मिसळणे, फिरायला जाणे खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून यामुळे एकटेपणा जाणवणार नाही. याशिवाय कामात व्यस्त राहणेही महत्त्वाचे आहे.
– व्यायाम, योगा किंवा झुंबा, एरोबिक्स यापैकी आवडते व्यायाम प्रकार करणेही सुरू करा. यामुळे तणाव दूर व्हायला मदत होते याशिवाय नवनव्या कामात व्यस्त राहिल्यामुळे नकारात्मक विचार कमी होऊ शकतात. अनावश्यक विचार करण्यात वेळ घालवू नका.




























































