पावसात भिजताय…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. गीता गांधी, बालरोगतज्ज्ञ

पाऊस सगळ्यांनाच आवडतो. लहान मुलेही त्याला अपवाद नाहीत. पावसाचा मनमुराद आनंद घ्याच, पण त्याबरोबरच आरोग्यही सांभाळणे गरजेचे आहे. हवेत गारठा वाढला की लहान मुलांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतो. मग ताप, सर्दी, खोकला यासारखे आजार सुरू होतात. त्यात लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी पडते. मुलं आजारी पडतात आणि त्यांना ऋतूबदलामुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारांची लगेच लागण होते.

पावसाळ्यात बाहेरचे अन्न आणि दूषित पाणी यामुळे हेपिटायटिस, विषमज्वर, अतिसार, जुलाब, उलट्या यासारखे संसर्ग होतात. एवढेच नाही तर दूषित पाण्यात चालल्याने लेप्टोस्पायरोसिस हा आजारही उद्भवू शकतो. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुन्यासारखे आजारही पावसाळ्यात होऊ शकतात.

हे लक्षात ठेवा

  • फ्ल्यू, हेपिटायटिस ए, विषमज्वर यावर लस उपलब्ध आहेत. जर आतापर्यंत मुलांना याचे लसीकरण केले नसेल तर करून घ्या.
  • पाणी उकळून आणि गाळूनच प्या.
  • घराच्या आसपास पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.
  • घरातून बाहेर पडताना डास चावणार नाहीत, यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात.
  • बाहेरून आणलेल्या फळं, भाज्या स्वच्छ धुवून घ्या.
  • खाण्याआधी हात स्वच्छ धुवा.