
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईत मॅनेजमेंट स्टडीजचे शिक्षण घेणारा तलाह ऊर्फ अबू बकार हनीफ पोतरिक (24) हाच मुंब्य्रात इसिसची फौज बनवणारा म्होरक्या असल्याचे उघडकीस आले आहे. तलाह हा मुंब्य्रातील सर्वात उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या दोस्ती प्लॅनेटच्या एमरॉल्ड टॉवरमध्ये राहत असल्याने याआधी कौसा व आसपासच्या झोपडपट्टय़ा, गल्लीबोळात काढणारी दहशतवादाची ‘पिलावळ’ आता थेट हायफाय सोसायट्यांमधून वळवळू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. तरुणांचे ब्रेनवॉशिंग करण्यात एक्सपर्ट असलेला तलाह मुंब्य्रातून अटक केलेल्या पाच जणांच्या इसिस भरतीचा मास्टरमाइंड असल्याचे समोर आल्याने तपास यंत्रणा सतर्क झाली आहे.
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) मुंबई व संभाजीनगर पथकाने 22 जानेवारी रोजी इसिसशी संबंधित नऊ जणांच्या टोळीच्या मुंब्य्रासह संभाजीनगर येथून मुसक्या आवळल्या होत्या. त्यातील मुंब्य्रातील तरुणांच्या पोलीस चौकशीत तलाहचे नाव समोर आले. त्यानुसार प्रजासत्ताक दिनालाच एटीएसच्या मुंबई व संभाजीनगर पथकाने तलाह याला दोस्ती प्लॅनेटच्या एमरॉल्ड टॉवरमधून ताब्यात घेतले. तलाहच्या अटकेनंतर सोसायटीत तणावपूर्व शांतता आहे.
या ठिकाणी जुलै 2018 मध्ये तलाह व त्याची आई अफिया, आजोबा इस्माईल दळवी यांच्यासोबत विक्रोळी पार्कसाइट येथून राहायला आला होता. त्याआधी त्याचे कुटुंब काही दिवस मुंब्रा येथील अमृतनगर भागात राहत होते, तर त्याचे वडील नोकरीनिमित्ताने कुवैतमध्ये असून एका इस्टेट एजंटमार्फत नुराली आणि रुक्साना शेख यांनी हा फ्लॅट तलाहच्या कुटुंबीयांना भाड्याने दिला होता. त्यावेळी पोलीस व्हेरिफिकेशन करूनच या उच्चभ्रू वस्तीत तलाहच्या आईने फ्लॅट भाडय़ाने घेतला. मात्र मुलाने असे ‘दिवे’ लावल्याने त्याची आई व आजोबा घराला कुलूप लावून त्यांच्या नातेवाईकांकडे गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
लॅपटॉप ठरवणार तपासाची दिशा
एटीएसने तलाहच्या घरातून लॅपटॉप, राऊटर, मोबाईल, हार्ड डिक्स, टॅबलेट, पेनड्राइव्ह जप्त केला असून जप्त केलेल्या लॅपटॉपमधून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतरच तपासाची पुढील दिशा समोर येणार असून इसिसच्या म्होरक्याशी तलाहचा थेट संबंध होता. त्यातूनच तो टोळीची सूत्रे हलवत होता, अशी माहितीही पोलीस तपासात पुढे आली आहे.
दहशतवाद्यांचा केंद्रबिंदू सरकतोय
दहशतवादी कारवायांमुळे बदनाम झालेल्या मुंब्य्रातून दहशतवाद्यांचा केंद्रबिंदू तलाहच्या अटकेनंतर शीळ-डायघरकडे सरकल्याचे दिसून आले. तलाह राहत असलेला दोस्ती प्लॅनेट टॉवर मुंब्रा-शीळ सीमेवर असून येथून मुंब्रा, नवी मुंबई, डोंबिवली हाकेच्या अंतरावर आहे.


























































