तालिबान्यांचा ‘खेळ’खंडोबा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेने पहिली तालिबानी राजवट उलथून टाकल्यावर अफगाणी क्रीडाविश्वाने थोडा निःश्वास सोडला होता. आत्मघाती हल्ले, बाँबस्फोट अशा भयग्रस्त वातावरणातही क्रिकेटसह इतर क्रीडाखेळांचे आयोजन सुरू राहिले. त्यामुळे अफगाणी क्रिकेट संघ असो अथवा इतर क्रीडा पथके असोत, देश-विदेशात त्यांचा सहभाग सुरू राहिला. महिला क्रीडापटूंनाही संधी मिळाली. या कालावधीत अफगाणी क्रीडापटूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली. पण आता क्रिकेटच नव्हे तर अफगाणिस्तानमधील एकूणच क्रीडा क्षेत्राच्या भवितव्याविषयी चिंता निर्माण झाली आहे.

अफगाणिस्तानमध्ये 20 वर्षांपूर्वी जेव्हा तालिबानची राजवट प्रथमच आली तेव्हा तालिबानी दहशतवाद्यांनी देशातील फुटबॉल मैदानांचा वापर विरोधकांच्या शिरकाणासाठी केला होता. आता दुसऱयांदा अफगाणिस्तानात सत्तेवर आल्यावर तालिबानी दहशतवादी बंदुका घेऊन थेट अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाच्या मुख्य कार्यालयातच घुसले. तेव्हा अफगाणी क्रिकेट क्षेत्र हादरून गेले. क्रिकेट जगताला काळजी लागली आहे ती अफगाणी क्रिकेटचे काय होणार याची! तात्पर्य काय तर तालिबानची मानसिकता 20 वर्षांपूर्वीचीच आहे. त्यामध्ये फारसा काही बदल झालेला नाही. त्यामुळे फक्त क्रिकेटच काय तर अफगाणिस्तानमधील एकूणच क्रीडाक्षेत्राच्या भवितव्याविषयी चिंता निर्माण झाली आहे.

तालिबान्यांनी सत्तेवर आल्यावर सर्वप्रथम अफगाणी क्रिकेट मंडळाच्या प्रमुखाची उचलबांगडी करून आपला माणूस तेथे आणला. याचाच अर्थ तालिबानचे क्रिकेटविषयीचे धोरण थोडे सौम्य आहे असे दिसून येते. पण इतर सर्व खेळ आणि मनोरंजन करणाऱया सर्व कलाप्रकारांवर बंदी घालण्याचे सध्या तरी त्यांचे धोरण आहे. कारण इस्लामी कायद्याच्या चौकटीबाहेरील कोणत्याही गोष्टीला ते थारा देत नाहीत. अफगाणी महिला क्रिकेट संघावर तर त्यांनी बंदी घातलीच आहे; शिवाय महिलांचे हक्क पायदळी तुडवण्यास सुरुवात केली आहे. महिलांनी फक्त घरकाम पाहायचे आणि मुलांना जन्म द्यायचा, एवढेच काम करायचे, असे एका तालिबानी नेत्याने म्हटल्याची बातमी मीडियावर झळकली होती.

आता अफगाणी महिला क्रिकेट संघावर तालिबानने बंदी घातल्यावर त्याचे पडसाद क्रिकेट विश्वात उमटत आहेत. महिला क्रिकेट संघावरील बंदी न उठवल्यास अफगाणी पुरुष संघाविरुद्धची आगामी मालिका आम्ही रद्द करू, अशी भूमिका ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने घेतल्यानंतर तालिबाननेही तुमची तशी भूमिका असेल तर आम्हीही आमचा संघ पाठवणार नाही, अशी त्यांच्या स्वभावानुसार आडमुठी भूमिका घेतली आहे. लवकरच अफगाणी क्रिकेट संघ पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या बरोबरही सामने खेळणार आहे.

तशातच ऑक्टोबरमध्ये होणाऱया टी-20 विश्व क्रिकेट स्पर्धेसाठी तालिबानच्या मुठीतील अफगाणी क्रिकेट मंडळाने आपला संघ जाहीर केल्यानंतर सध्या ब्रिटनमध्ये एका स्पर्धेत खेळत असलेला अफगाणी कर्णधार रशिद खानने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्याला न बोलावता संघनिवड केली याचा अशाप्रकारे रशिद खानने निषेध केला आहे. त्याच्या जागी आता अष्टपैलू मोहम्मद नबीची कर्णधार म्हणून निवड झाली आहे. पण हा संघ या क्रिकेट स्पर्धेत भाग घेईपर्यंत आणखी काय घडामोडी घडतील सांगता यायचे नाही. कारण महिला क्रिकेट संघावर तालिबानने बंदी घातल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आयसीसी) अ. क्रि. मंडळावर बंदी घालावी अशी मागणी होत आहे. पण तसे झाल्यास अफगाणी पुरुष संघाचेही नुकसान होऊन उरलीसुरली आशाही संपुष्टात येईल.

खरं म्हणजे क्रिकेट आधी अफगाणिस्तानमध्ये फुटबॉलची थोडी क्रेझ होती. या भूमीत शतकभरापूर्वी थोडेफार क्रिकेट खेळले जायचे, पण युद्धकाळामुळे तेथे ब्रिटिशांना हा खेळ रुजवता आला नाही. पण पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या अफगाणी निर्वासितांना या खेळाची गोडी लागली ती हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांच्या वेळी निर्माण झालेल्या वातावरणातून! विशेष म्हणजे या निर्वासितांमध्ये काही तालिबानी दहशतवादीही दडून बसले होते. त्यामुळेच तालिबान्यांना क्रिकेटविषयी थोडी सहानुभूती आहे. त्यामुळेच क्रिकेटने तेथे थोडी गती घेतली ती तालिबानच्या पहिल्या राजवटीच्या काळातच!

अमेरिकेने पहिली तालिबानी राजवट उलथून टाकल्यावर अफगाणी क्रीडाविश्वाने थोडा निःश्वास सोडला. आत्मघाती हल्ले, बाँबस्फोट अशा भयग्रस्त वातावरणातही क्रिकेटसह इतर क्रीडाखेळांचे आयोजन सुरू राहिले. त्यामुळे अफगाणी क्रिकेट संघ असो अथवा इतर क्रीडापथके असोत, देश-विदेशात त्यांचा सहभाग सुरू राहिला. महिला क्रीडापटूंनाही संधी मिळाली. या कालावधीत अफगाणी क्रीडापटूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली. अफगाणी क्रिकेटला आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व मिळाले ते 2017 मध्ये! या संघाने काही आंतरराष्ट्रीय झटपट क्रिकेट सामने खेळून काही जिंकले आहेत. अर्धा डझन कसोटी सामने खेळलेल्या अफगाणिस्तानने बांगलादेशावर 262 धांवांनी चमकदार विजय मिळवला होता. अफगाणी क्रिकेटच्या प्रगतीस सर्वात जास्त हातभार लावला तो हिंदुस्थाननेच. त्यामुळे अफगाणी संघाने पहिली कसोटी खेळली ती हिंदुस्थानविरुद्ध बेंगळुरूमध्ये!

1948 च्या ऑलिम्पिकमध्ये अफगाणी फुटबॉल संघाने भाग घेतला होता. खलिदा पोपल ही पहिल्या अफगाणी महिला फुटबॉल संघाची कर्णधार होती. पण तालिबान्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर तिने देश सोडला. आता ती डेन्मार्कमध्ये निर्वासित म्हणून जगत आहे. तालिबानचे सत्तेवर पुनरागमन झाल्यावर अनेक क्रीडापटूंनी एकतर देश सोडला आहे किंवा ते देशाबाहेर जाण्याच्या बेतात आहेत.

ऑगस्टमध्ये तालिबान्यांनी सत्ता हासिल केल्यानंतर अफगाणी नागरिकांची देशाबाहेर जाण्यासाठी काबुल विमानतळाबाहेर धांदल उडाली, त्यामध्ये अनेक खेळाडू आणि कलाकारही होते. यावेळी अमेरिकन विमानातून खाली पडून 19 वर्षीय अफगाणी फुटबॉलपटू झाकी अनवारी मरण पावला होता. तर विमानतळाबाहेर झालेल्या स्फोटात तीन क्रीडापटू ठार झाले होते. या दुर्घटनेने जग हळहळले होते. सर्वसामान्य अफगाणी नागरिकांनी तालिबानची किती धास्ती घेतली आहे ते यावरून दिसून येते.
क्रिकेट आणि फुटबॉलव्यतिरिक्त बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, बॉडीबिल्डिंग, बुद्धिबळ, मार्शल आर्टस् असे इतर अनेक खेळ अफगाणिस्तानमध्ये खेळले जातात. अफगाणी बास्केटबॉल संघाने 2010 मध्ये द. आशियाई क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. त्याचप्रमाणे एशियन गेम्सचे ते विजेते ठरले होते. हमीद रहिमी हा तेथील लोकप्रिय बॉक्सर आहे. 2017 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये बॉडीबिल्डर अहमद कादरीने ‘मिस्टर मसल’ हा किताब मिळवला होता. 2015 मध्ये अफगाणिस्तानमध्ये पहिली मॅरेथॉन स्पर्धा आयोजण्यात आली होती. या स्पर्धेत 25 वर्षीय महिला धावपटू झैनाबने ही शर्यत पूर्ण करणारी पहिली अफगाणी महिला धावपटू हा बहुमान मिळवला होता. यावरून असं दिसून येतं की, सर्वसामान्य अफगाणी नागरिक हे क्रीडाप्रेमी आणि शांतताप्रिय आहेत, पण आता ते कट्टरतावादी तालिबानी दहशतवाद्यांचे गुलाम बनले आहेत.

आखातातील देश इस्लामी असले तरी ते आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत असतात. क्रीडाखेळांविषयी त्यांचे धोरण बरेचसे सौम्य आहे. अबुधाबी, शारजा येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होत असतात. याचा तरी बोध कट्टर तालिबान्यांनी घ्यायला पाहिजे, पण सत्तेवर येताच त्यांनी दडपशाही, जुलूमशाही सुरू केली आहे. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांत बहरण्याच्या मार्गावर असलेले अफगाणी क्रीडाक्षेत्र पुन्हा अंधकारात ढकलले जाण्याची शक्यता आहे.