
तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध केले आहे. विश्वासदर्शक ठरावात विजय सरकारला १४४ आमदारांचा पाठिंबा मिळाला तर, विरोधात केवळ २२ मते पडली. ही मतेही अण्णाद्रमुक च्या एका गटाकडून आली. विशेष म्हणजे, त्याच पक्षातील २५ आमदारांनी विजय यांच्या समर्थनार्थ मतदान केले. प्रमुख विरोधी पक्ष द्रमुकने या विश्वासदर्शक ठरावावेळी सभात्याग केला. या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष द्रमुकचा जरी पराभव झाला असला तरी, सर्वाधिक फटका हा अण्णाद्रमुकला बसला आहे. सलग दुसऱ्यांदा या पक्षाचा पराभव झाला असून हा पक्ष फूटल्याचे विश्वासदर्शक ठरावावेळी स्पष्ट झाले.
विधानसभा निवडणुकीनंतर तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेलेली अण्णाद्रमुक आता जवळपास दोन गटांत विभागली गेली आहे. बंडखोर गटाकडे अद्याप दोन-तृतीयांश आमदारांचे समर्थन नसल्याने पक्षफुटीला अधिकृत स्वरूप मिळणे कठीण मानले जात आहे. या घडामोडींमुळे पक्षाचे अध्यक्ष पलानीस्वामी यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तमिळनाडूच्या निवडणुकीत विजय यांच्या टीव्हीके पक्षाने जोरदार कामगिरी करत द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन्ही पारंपरिक पक्षांना मोठा धक्का दिला. प्रचारादरम्यान विजय यांनी आपली थेट लढत एम. के. स्टॅलिन यांच्याशी असल्याचे सांगितले होते. त्यांनी स्टॅलिन यांना सत्तेपासून दूर केले. पण सर्वाधिक फटका अण्णाद्रमुकला बसल्याचे राजकीय विश्लेषक मानत आहेत.
द्रमुकचे नेतृत्व असलेली आघाडीही आता विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. काँग्रेस आणि व्हीसीके या पक्षांनी विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा दिल्यानंतर द्रमुक आघाडीला धक्का बसला. त्यामुळे तमिळनाडूच्या बदलत्या राजकीय समीकरणात स्टॅलिन यांची पुढील भूमिका काय राहणार? याकडे लक्ष लागले आहे.
नव्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनातच अण्णाद्रमुकमधील फूट पहिल्यांदा स्पष्टपणे दिसून आली. बंडखोर गटाचे नेते सी.व्ही. षण्मुगम यांनी विजय यांच्या सरकारला पाठिंबा जाहीर केला. सुरुवातीला त्यांच्या गटाकडे ३० आमदार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, विश्वासदर्शक ठरावातील मतदानानंतर त्यांना २४ आमदारांचे समर्थन असल्याचे स्पष्ट झाले.
२३४ जागांपैकी १६७ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या अण्णाद्रमुकला केवळ ४७ जागांवर विजय मिळाला होता. पक्षातील एका गटाने पलानीस्वामी यांनाच विधानसभेतील पक्षनेते मानले, तर दुसऱ्या गटाने एस.पी. वेलुमणी यांना विरोधी पक्षनेते करण्याची मागणी केली आहे. काही बंडखोर आमदारांनी तर पलानीस्वामी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.
दरम्यान, सी. व्ही. षण्मुगम यांच्या गटाने हंगामी अध्यक्ष एम. व्ही. करप्पैया यांना पत्र देत वेलुमणी यांना अण्णाद्रमुक विधिमंडळ गटनेते घोषित करण्याची मागणी केली. त्याचवेळी माजी मंत्री एन. थलवाई सुंदरम यांनी पलानीस्वामी यांनाच पक्षनेते ठेवण्याची भूमिका घेतली.
षण्मुगम गट विजय सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याच्या बाजूने आहे. मात्र दुसरा गट त्याला विरोध करत आहे. “आमचा अण्णाद्रमुक फोडण्याचा हेतू नाही. पलानीस्वामी हेच आमचे नेते आहेत,” असे षण्मुगम यांनी स्पष्ट केले. मात्र, टीव्हीके सरकारला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर ते ठाम राहिले.
“तमिळनाडूच्या जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारत आहोत. हा जनादेश टीव्हीकेसाठी नाही, तर विजय यांच्यासाठी आहे. आम्ही टीव्हीके सरकारला पाठिंबा देत आहोत. जर आम्ही द्रमुकसोबत गेलो असतो तर अण्णाद्रमुकचे अस्तित्वच संपले असते,” असे षण्मुगम यांनी म्हटले.
द्रमुकने मात्र हे दावे फेटाळले आहेत. आर.एस. भारती यांनी षण्मुगम यांच्यावर टीका करत, “ते स्वतःच्या पक्षातील फूट झाकण्यासाठी द्रमुकवर निराधार आरोप करत आहेत,” असा आरोप केला.
१९७२ मध्ये एम.जी रामचंद्रन यांनी अण्णाद्रमुकची स्थापना केली होती. त्यानंतर जे. जयलिता यांनी पक्षाचे दीर्घकाळ नेतृत्व केले. मात्र त्यांच्या निधनानंतर पक्षात नेतृत्व संघर्ष वाढत गेला. पलानीस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण केला, पण विधानसभा निवडणुकीत त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.
आता अण्णाद्रमुकमधील मोठा गट विजय यांच्या टीव्हीकेकडे झुकत असल्याने तमिळनाडूच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, अण्णाद्रमुकचा फुटलेला गट टीव्हीकेसोबत गेल्यास विजय यांची ताकद आणखी वाढेल आणि द्रमुकसमोर नवे आव्हान उभे राहील.




























































