बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’चा जय घोष; 3 दिवसात इतकी कमाई

2649
tanhaji

स्वराज्यासाठी बलिदान करणारे नरवीर तान्हाजी मालूसरे यांच्या जीवनावर आधारित भव्य चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतो आहे. ‘भवानी कें विरों…’ अशी साद घालत ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. पहिल्या दिवशीपासूनच ‘तान्हाजी’ चित्रपटासाठी प्रेक्षक गर्दी करत असून शनिवार-रविवारी तर अनेक ठिकाणी शो हाऊस फुल झाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या तीन दिवसाच्या कमाईचा अंदाज पाहता 61 कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने केली आहे.

ट्रेंड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी तीन दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी आणखी वेग घेत घोडदौड सुरू ठेवली आहे. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 26.08 कोटी रुपये कमावले आहेत. पहिल्या दिवशी 15.10 कोटी, दुसऱ्या दिवशी 20.57 कोटी तर तिसऱ्या दिवशी 26.08 कोटी असे तीन दिवसात 61.75 कोटी रुपये कमाई झाली आहे.

तान्हाजी द अनसंग वॉरियरला हिंदुस्थानात 3880 स्क्रीन्स मिळाले आहेत. यामध्ये 2D आणि 3D चा समावेश आहे. तर विदेशात 660 स्क्रीन्स मिळाले आहेत. एकूण या चित्रपटाला 4540 इतके स्क्रीन्स मिळाले आहेत.

ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेल्या तान्हाजी द अनसंग वॉरियर चित्रपटात बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने तान्हाजी यांची भूमिका साकारली आहे. तर काजोलने त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. दोघांनी तगडा अभिनय केला आहे. विषयापासून जराही दूर न जाता त्यातले बारकावे टिपत अत्यंत खुबीने हा जिवंत सिने अनुभव आपल्या वाटय़ाला येतो. अजय देवगणने ही भूमिका सहज उभी केली आहे यात वादच नाही, पण त्याच्यासोबत छोट्या भूमिकेत काजोलनेदेखील सावित्री मालुसरे म्हणून ठसठशीत शिक्का उमटवला आहे. शरद केळकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका उत्तम साकार केली आहे. सैफ अली खान याने उदयभान राठोड तितक्याच ताकदीने उभा केला आहे.

दरम्यान, दीपिका पडुकोण अभिनित ‘छपाक’ला देखील चांगला देखील चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’च्या तुलनेत छपाक फारशी कमाई करू शकलेला नाही. छपाकने तीन दिवसात 19.02 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या