धर्माच्या बुरख्याआड पासपोर्ट अधिकाऱ्याची बदनामी? सरकारने केली बदली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, लखनऊ

मुसलमानाशी लग्न करणाऱ्या हिंदू महिलेने पासपोर्ट अधिकाऱ्याने आम्हाला धर्म बदला आणि मगच या अशी जबरदस्ती केल्याचा आरोप केल्याने उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. विकास मिश्रा नावाच्या अधिकाऱ्यावर अनस सिद्दीकी आणि तन्वी सेठ (सादिया हसन, लग्नानंतर बदललेले नाव) यांनी हा आरोप केला होता. अनसने पासपोर्टची मुदत वाढवण्यासाठीचा अर्ज केला होता तर त्याची बायको तन्वीने नव्या पासपोर्टसाठी अर्ज केला होता. या दोघांनी आरोप केला आहे की मिश्रा पासपोर्टसाठी धर्म बदलावा लागेल, सप्तपदी करावी लागेल आणि हिंदू मंत्र म्हणावे लागतील अशी जबरदस्ती केली. आम्ही याबाबत पासपोर्ट अधिकाऱ्यांशी बातचीत करून नियम काय सांगतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या नियमांकडे पाहिल्यास मिश्रा यांनी चूक केली नसून त्यांच्यावर या जोडप्याने मुद्दाम आरोप केला असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

२००७ साली अनस आणि तन्वी यांचा निकाह झाला होता. त्यांनी लखनऊ इथे पासपोर्टचा अर्ज केला होता. २० मे रोजी या दोघांना पासपोर्टसाठी अपॉईन्टमेंट मिळाली होती. विकास मिश्रा यांच्यासमोर अर्ज घेऊन पोहोचल्यानंतर ते आपल्यावर ओरडायला लागले आणि म्हणाले “की तू धर्म बदलायला नको होतास, जा आणि सगळ्या कागदपत्रांवर बदललेलं नाव घालून ये” असा आरोप तन्वीने केला आहे. भरगच्च भरलेल्या पासपोर्ट कार्यालयात मिश्रा जोरजोरात ओरडत असल्याने मला भयंकर अपमानित झाल्यासारखं वाटलं असं तन्वीचं म्हणणं आहे. तिने आरोप केला आहे की अपमान तर केलाच शिवाय अनस याचा पासपोर्ट मुदतवाढीचा अर्ज देखील अडवून धरण्यात आला.

विकास मिश्रा यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी त्यांच्यावर लावलेले आरोप चुकीचे असल्याचं म्हटलंय. मिश्रा म्हणाले की मी जे काही केलं ते नियमानुसार केलेलं आहे. मिश्रा म्हणाले की पासपोर्टसाठीच्या अर्जामध्ये तन्वी यांनी जुनं नाव दिलेलं होतं. या अर्जामध्ये तुम्ही तुमचं नाव बदललेलं आहे का यात हो म्हणणं गरजेचं होतं, मात्र तन्वी यांनी सादिया हसनऐवजी तन्वी हेच नाव अर्जात दिलं. निकाहनाम्यात वेगळं नाव आणि पासपोर्टमध्ये वेगळं नाव असं चालू शकत नाही. याशिवाय हे जोडपं गाझियाबादमध्ये रहात असतानाही त्यांनी लखनऊला रहात असल्याचं सांगून इथल्या पासपोर्ट केंद्रात अर्ज केला होता. या दोन्ही गोष्टी नियमात बसत नसतानाही आपण याबाबत वरिष्ठांकडे सल्ला मागितला होता असं मिश्रा यांनी म्हटलंय. मी तन्वी यांच्यावर ओरडलो नाह तर त्याच माझ्या अंगावर ओरडत होत्या असंही मिश्रा यांनी म्हटलं आहे.