टीम इंडियाला 12 खेळाडू देणारे ‘गुरु द्रोणाचार्य’ तारक सिन्हा यांचे निधन, पंतने दिलेला वडिलांचा दर्जा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या संघाला अनेक नामवंत खेळाडू देणारे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक तारक सिन्हा (Tarak Sinha) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच कालावधीपासून आजारी होते. अखेर आज पहाटे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

तारक सिन्हा हे दिल्लीमध्ये ‘सोनेट क्रिकेट क्लब’ नावाने एक क्रिकेट अकादमी चालवत होते. येथे त्यांनी घडवलेल्या 12 खेळाडूंनी टीम इंडियाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले, तर 100 हून अधिक खेळाडूंनी प्रमथ श्रेणी क्रिकेटमध्ये आपल्या बॅटची जादू दाखवली. पुरुष खेळाडूंसह त्यांनी महिला क्रिकेटपटू अंजुम चोप्रा हिलाही क्रिकेटचे डावपेच शिकवले होते.

दरम्यान, तारक सिन्हा यांच्या निधनाची माहिती जेष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांनी ट्वीट करून दिली. तारक सिन्हा यांना आपल्या योगदानाबद्दल द्रोणाचार्य पुरस्कारही मिळाला होता. हा पुरस्कार मिळवणारे ते पाचवे प्रशिक्षक होते. त्याआधी देश प्रेम आझाद, गुरुचरण सिंह, रमाकांत आचरेकर आणि सुनिता शर्मा यांना हा पुरस्कार मिळालेला आहे.

तारक सिन्हा यांचे ’12 शिलेदार’

तारक सिन्हा यांनी घडवलेल्या क्रिकेटपटूंची मोठी यादी आहे. मात्र यातील 12 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. यात सुरिंदर खन्ना, रंधीर सिंह, रमन लांबा, मनोज प्रभाक, अजय शर्मा, केपी भास्कर, अतुल वासन, आशिष नेहरा, संजीव शर्मा, आकाश चोप्रा, शिखर धवन, आणि रिषभ पंत यांचा समावेश आहे. यासह महिला खेळाडू अंजुम चोप्रा हिलाही तारक सिन्हा यांनी प्रशिक्षण दिले होते.

कारकिर्द

तारक सिन्हा हे दिल्ली संघाचे प्रशिक्षकही राहिले आहेत. त्यांच्या प्रशिक्षणपदाच्या कार्यकाळात दिल्ली संघाने 1985-86 साली रणजी स्पर्धा जिंकली होती. 2001-02 मध्ये ते हिंदुस्थानच्या महिला संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या कार्यकाळात मिताली राज आणि झुनल गोस्वामी यासारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांच्याच कार्यकाळात महिला संघाने विदेशात पहिला कसोटी सामना जिंकला होता, तर इंग्लंडला घरच्या मैदानावर 4-0 अशा फरकाने पराभूत केले होते. 2002 मध्ये ते दिल्लीच्या ज्यूनिअर संघाचे प्रशिक्षक बनले. त्यांच्या कार्यकाळात दिल्लीच्या ज्यूनिअर संघाने अंडर-15, अंडर-19 आणि अंडर-22 स्पर्धा जिंकल्या.

पंतने दिलेला वडिलांचा दर्जा

रिषभ पंत याला महेंद्रसिंह धोनीचा वारसदार मानले जाते आणि या हिऱ्याचा घडवण्याचे काम तारक सिन्हा यांनी केले होते. पंतच्या शिक्षणाची व्यवस्थाही त्यांनी केली होती. पीटीआयशी बोलताना पंतने एकदा तारक सर माझ्या वडिलांसारखे नाही तर ते माझे वडीलच आहेत, असे म्हटले होते.