
वरच्या भागात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने तारळी नदीच्या पाणीपातळीत अचानक मोठी वाढ होऊन त्यात नदीपात्रात धुण्यासाठी आणलेली आल्याची सातशे पोती ट्रक्टर-ट्रॉलीसह वाहून गेली. कराड तालुक्यातील इंदोली येथे शनिवारी सायंकाळी ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. या घटनेत शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उंब्रजजवळील इंदोली फाटय़ापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर इंदोली गाव आहे. गावाशेजारून तारळी नदी वाहते. इंदोली परिसरातील आले उत्पादक शेतकरी आले काढल्यानंतर धुण्यासाठी तारळी नदीच्या पात्रात घेऊन येत असतात. त्याप्रमाणे कालही इंदोलीतील विक्रम गुलाबराव कदम (सहाशे पोती) व युवराज लक्ष्मण जाधव (शंभर पोती) हे शेतकरी 70 मजुरांसह आले घेऊन नदीपात्रावर धुण्यासाठी आले होते. आले आणलेला ट्रक्टर ट्रॉलीसह उभा होता. मजूर आले धुऊन पोत्यात भरण्याचे काम करीत होते.
त्याचवेळी वरच्या भागात ढगफुटीसारखा पाऊस झाल्यामुळे सायंकाळी साडेचारच्या सुमारास तारळी नदीच्या पाणीपातळीत अचानकपणे प्रचंड मोठी वाढ झाली. मात्र, इंदोली भागात त्यावेळी पावसाचा थेंबही नव्हता. त्यामुळे शेतकरी गाफील राहिले. अचानकपणे नदीने रौद्र स्वरूप धारण केल्याने सर्वांचीच भयंकर तारांबळ उडाली. त्या रौद्ररूपापुढे कोणीही काही करू शकले नाही. शेतात रात्रंदिवस राबून, पाण्यासारखा पैसा खर्च करून उत्पादित केलेले तब्बल सातशे पोती आले डोळ्यांदेखत वाहून गेले. पुराच्या पाण्यात ट्रक्टरही भरकटला. पाणी इतके प्रचंड होते की शेतकरी काहीच करू शकले नाहीत.
या घटनेनंतर तारळी नदीच्या पुलावर ग्रामस्थांनी गर्दी केली होती. दरम्यान, तलाठी व सर्कल पंचनामा करण्यासाठी सायंकाळी उशिरा घटनास्थळी दाखल झाले होते. आज सकाळी नदीचे पाणी ओसरल्यापासून शेतकऱयांनी नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. इंदोलीपासून भोसलेवाडीपर्यंतच्या तीन ते चार किलोमीटर नदीपात्रात शोध घेत सायंकाळपर्यंत केवळ 60 ते 70 पोती आले मिळवण्यात त्यांना यश आले. या शोधमोहिमेत शेतकऱयांसमवेत ग्रामस्थही सहभागी झाले होते. तसेच भरकटलेला ट्रक्टर काही अंतरावर वाळूत रुतून बसलेल्या
अवस्थेत आढळला.





























































