
जम्मू कश्मीरमध्ये पीएम पॅकेज अंतर्गत काम करणाऱ्या कश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या सुरक्षेबाबत आवाज उठवला आहे. कश्मीरमधून पळून जम्मूमध्ये पोहोचलेल्या या कश्मिरी पंडितांनी पुन्हा एकदा निषेध व्यक्त करत त्यांना सुरक्षित स्थळी काम करण्यास पाठण्याची विनंती सरकारकडे केली आहे.
दोन महिन्यांपूर्वी कश्मीरमध्ये झालेल्या ‘टार्गेट किलिंग’मुळे सर्व कश्मिरी पंडित कर्मचारी पळून जम्मूत पोहोचले होते. तेव्हापासून कश्मीरी पंडित आपली सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलन करत आहेत.
हे सर्व कर्मचारी कश्मीरमध्ये पीएम पॅकेज अंतर्गत काम करत आहेत. मात्र दिवसाढवळ्या होत असलेल्या टार्गेट किलिंगमुळे त्यांनी कश्मीरमधून बाहेरचा रस्ता पकडला आहे. आता त्यांच्या नोकरी आणि जीवाच्या सुरक्षेसाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी काम देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
जोपर्यंत आम्हाला सुरक्षित वातावरण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कश्मीरमध्ये परत जाणार नाही, असे कश्मिरी पंडितांचे म्हणणे आहे. तुम्ही आमच्याकडून सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत काम घ्या. पण एकेकाळी ज्या पद्धतीने काम ऑनलाइन केले जात होते, त्याच पद्धतीने आम्ही आजही ऑनलाइन काम करण्यास तयार आहोत. जोपर्यंत आम्हाला ठिकाणी पाठवले जात नाही तोपर्यंत आम्ही परत जाणार नाही.




























































