Tata Technologies IPO – गुंतवणूकदार झाले मालामाल, 500 रुपयांचा आयपीओ 1300 पार

टाटा समूहाचा आयपीओ तब्बल 20 वर्षांनी बाजारात दाखल झाला आणि पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मालामाल करून गेला. ‘टाटा है तो विश्वास है!’, हे वाक्य टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओबाबतही खरे ठरले आहे. टाटा टेक्नॉलॉजीचा आयपीओ आज बाजारात 140 टक्क्यांच्या वाढीसह लिस्टिंग झाला. यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे.

टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओवर गुंतवणूकदार तुटून पडले होते. काल या शेअरचे अलॉटमेंट झाले आणि आज लिस्टिंग झाले. Tata Technologies चे शेअर्स आपल्या इश्यू प्राईज 500 च्या तुलनेत तब्बल 140 टक्के प्रिमिअवर म्हणजेच 1200 रुपयांवर लिस्ट झाले. बीएसई आणि एनएसई दोन्हीकडे ata Technologies चे शेअर तुफान धावताहेत.

लिस्टिंगनंतरही यात वाढ पहायला मिळाली आणि शेअरची किंमत थेट 1300 पार पोहोचली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा हा शेअर 1327 रुपयांवर ट्रेड करत होता. याचाच अर्थ शेअरच्या किंमतीमध्ये तब्बल 166 टक्के वाढ झाली.

Gandhar oil नेही दिले जबरदस्त रिटर्न

दरम्यान, आज टाटा सोबत Gandhar oil या कंपनीचे शेअरही लिस्ट झाले. या कंपनीनेही गुंतवणूकदारांना भरभरून दिले आहे. Gandhar oil ची इश्यू प्राईज 169 रुपये होते. हा शेअर 70 टक्क्यांहून अधिक प्रिमियमसह लिस्ट झाला असून सध्या यात 83 टक्के वाढ झाली आहे. हा शेअर 310 रुपयांवर ट्रेड करतोय.

IREDA नेही केलं मालामाल

तत्पूर्वी बुधवारी IREDA चा शेअर बाजारात लिस्ट झाला. या शेअरनेही गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. पहिल्याच दिवशी हा शेअर जवळपास 85 टक्के वाढला. 32 रुपये इश्यू प्राईज असलेला हा शेअर 60 रुपयांपर्यंत पोहोचला. यात आजही जवळपास 10 टक्के वाढ नोंदवण्यात आली असून शेअरचा भाव 65 रुपयांवर पोहोचला आहे.