
वाढत्या महागाईच्या काळात दिवाळीचा बोनस आणि भेटवस्तू स्वीकारणाऱ्या नोकरदारांना मोदी सरकारने जोरदार झटका दिला आहे.
केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे. हे कमी म्हणून की काय, आता दिवाळी सणाच्या निमित्ताने मिळणारा बोनस आणि भेटवस्तूंवरही टॅक्स लावला जाणार आहे. दिवाळीत मिळालेला बोनस आणि महागडय़ा भेटवस्तूंची माहिती आयकर विवरणपत्रात देणे बंधनकारक असून तसे न केल्यास दंड आकारण्यात येणार आहे.
दिवाळीला भेटवस्तू देणे आणि घेणे सर्वांनाच आवडते. सणवाराच्या दिवशी भेटवस्तू देणे-घेणे सामान्य असले तरी रोख रक्कम, सोन्याचे दागिने, महागडी उपकरणे, गाडी आणि मालमत्ता यासारख्या भेटवस्तूंवर कर लागू शकतो. आयकर कायद्याच्या कलम 56(2) नुसार आर्थिक वर्षात मिळालेल्या भेटवस्तूंवर स्लॅब दरानुसार ‘इतर स्रोतांकडून मिळकत’ म्हणून कर आकारला जाऊ शकतो. जोडीदार, भावंड, पालक, सासू-सासरे यांच्याकडून मिळालेल्या भेटवस्तूंवर कोणताही कर भरावा लागणार नाही.
भेटवस्तू काय ?
रोख, धनादेश किंवा बँक ड्राफ्टद्वारे मिळालेले पैसे
घर, जमीन यासारखी स्थावर मालमत्ता, दागिने, सोने, कलाकृती
माहिती लपविल्यास 200 टक्केपर्यंत दंड
रोख स्वरूपात किंवा इतर कोणतीही स्थावर मालमत्ता 50 हजार रुपयांपेक्षा जास्तीची भेटवस्तू म्हणून मिळाली असेल तर आयकर भरताना ही माहिती विवरणपत्रात देणे आवश्यक आहे. संपूर्ण माहिती दिली नाही आणि आयकर विभागाच्या तपासणीत हे उघड झाले तर प्राप्त रकमेवर आयकर विभाग 200 टक्केपर्यंत दंड आकारू शकतो, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
या भेटीवर कर आकारणी
आर्थिक वर्षात नातेवाईक नसलेल्या व्यक्तीकडून 50 हजार रुपयांपर्यंत भेटवस्तू मिळाल्यास ते आयकरातून मुक्त आहे. पण यापेक्षा जास्त रक्कम म्हणजे 51 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम भेट म्हणून मिळाली तर आयकर भरावा लागेल.
नातेवाईक किंवा कोणत्याही व्यक्तीला जमीन किंवा घर भेट दिल्यास त्यावर मालमत्तेचे मुद्रांक शुल्क 50 हजार रुपयांपेक्षा जास्त मूल्यानुसार आयकर भरावा लागेल.
दागिने, चित्रे, रेखाचित्रे, शेअर्स, पुरातत्व संग्रह, सोने आणि चांदी इत्यादी आर्थिक वर्षात भेट म्हणून मिळाले आणि त्याचे बाजारमूल्य 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर कर भरावा लागेल.




























































