
यूटय़ूब प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ अपलोड करून त्याद्वारे यूटय़ूबर्स लाखो रुपयांची कमाई करतात. आता मात्र यूटय़ूबर्सना यूटय़ूबवरून पैसे कमावणे तितकेसे सोपे नसेल. कारण कंपनीने नवीन पॉलिसी तयार करण्याची योजना आखलीय. त्यानुसार यूटय़ूबवरून केल्या जाणाऱया कमाईवर टॅक्स भरावा लागेल अशी माहिती गूगलने अधिकृत ई-मेलद्वारे यूटय़ूबर्सना दिली आहे. अमेरिकेतील युटय़ूबर्स वगळता इतर सर्व देशांतील युटय़ूबर्ससाठी हा नियम लागू असणार आहे. जून 2021 पासूनच या नियमाची अंमलबजावणी होऊ शकते.
- नाईन टू फाईव्ह गूगलने आपल्या रिपोर्टनुसार गूगलने आपल्या अधिकृत कम्युनिकेशनमध्ये म्हटलेय की, योग्य टॅक्स कपात करण्यासाठी आम्ही क्रिएटरला ऍडसेन्स टॅक्स भरण्याविषयी माहिती विचारू. मात्र 31 मेपर्यंत माहिती न मिळाल्यास गूगल तुमच्या मासिक कमाईच्या 24 टक्के रकमेत कपात करेल.
- उदाहरणार्थ, एखाद्या क्रिएटरने यूटय़ूबद्वारे महिन्याला 73 हजार रुपयांची कमाई केली असेल, पण त्याबाबत माहिती दिली नसल्यास त्याच्या कमाईतून तब्बल 18 हजार रुपये टॅक्स स्वरूपात कपात करण्यात येतील. त्या क्रिएटरने वेळीच टॅक्सची माहिती दिली असेल तर त्याला केवळ 1100 रुपये टॅक्स भरावा लागेल. कारण हिंदुस्थान आणि अमेरिकेत करासंबंधीचा करार आहे.
- टॅक्स सुरु केल्यामुळे हिंदुस्थानातील यूटय़ूबर्सना मोठा झटका बसणार आहे. कारण अमेरिकेतील यूटय़ूबर्सच्या तुलनेत त्यांना मिळणारे पैसे खूप कमी आहेत.
























































