
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातंर्गत बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱया शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील या तरतुदीची लवकरच अंमलबजावणी होणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 अंतर्गत शिक्षण क्षेत्रात अनेक बदल करण्यात आले आहेत. मुलांचे शिक्षण, नमुने तसेच शिक्षक होण्याच्या पात्रतेशी संबंधित हे बदल केले जात आहेत. आधी खासगी किंवा सरकारी शाळेत आठवीपर्यंत शिक्षक होण्यासाठी टीईटी देणे आवश्यक होते, मात्र आता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱया शिक्षकांनादेखील टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले जाणार आहे.
सुरुवातीच्या टप्यात बारावीपर्यंत टीईटी हा नियम हरयाणा, केरळ, ओडिशा या राज्यांमध्ये लागू होणार आहे. या राज्यांमध्ये राज्य शिक्षक पात्रता परीक्षा बारावीपर्यंत लागू करण्यात आली आहे. लवकरच देशातील सर्व राज्यांमध्ये बारावीपर्यंत टीईटीचा नियम लागू केला जाणार आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा केंद्रीय स्तरावरील शिक्षकांच्या पात्रतेसाठी घेतली जाते. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये टीईटी परीक्षा पेपर-1 पहिली ते पाचवीसाठी आणि पेपर-2 सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी घेतला जातो, मात्र आता तो नववी ते बारावीसाठी बंधनकारक केला जाणार आहे.


























































