मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी चूक केली असेल तर शिक्षा भोगावीच लागेल; ममता बॅनर्जी यांची स्पष्ट भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी अटक केली. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदाच  चॅटर्जी यांच्याबाबत विधान केले आहे. जर कोणी चूक केली असेल, तर त्याला शिक्षा भोगावीच लागेल, अशी स्पष्ट भूमिका ममता बॅनर्जी यांनी मांडली.

मी भ्रष्टाचार किंवा कोणत्याही चुकीच्या कामाचे समर्थन करत नाही. जर कोणी दोषी आढळला तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. पार्थ चॅटर्जी दोषी असतील तर त्यांना कितीही मोठी शिक्षा झाली तरी मला त्याची पर्वा नाही. अशा लोकांना आम्ही पाठिंबा देणार नाही. मात्र विहित मुदतीत सत्याच्या आधारे निर्णय द्यायला हवा, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

अर्पिता मुखर्जी या महिलेशी सरकारचा काहीही संबंध नाही. या प्रकरणात जाणूनबुजून तृणमूल कॉँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. अशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर आमचा पक्ष तोडण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचे आहे. लवकरच याबाबतच सत्य बाहेर येईल, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.

चॅटर्जींपासून ममता दूर,    फोनसुद्धा घेतला नाही

ईडीने अटकेची कारवाई केल्यानंतर मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्यापासून दूर राहणचं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पसंत केलं आहे. ईडी अटकेची कारवाई करत असताना पार्थ चॅटर्जी यांनी ममता बॅनर्जी यांना फोन करुन अटकेची माहिती द्यायची असल्याचं सांगितलं. त्यांनी ममता बॅनर्जी यांना चार वेळा फोन लावला. पण एकदाही फोन उचलण्यात आला नाही.

भुवनेश्वर ‘एम्स’ने सांगितले – चॅटर्जींची प्रकृती स्थिर

चॅटर्जी यांना सोमवारी सकाळी कोलकाता येथून भुवनेश्वरला हलविण्यात आले. येथील एम्स रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली. एम्सचे डायरेक्टर आशुतोष बिस्वास यांनी चॅटर्जी यांची प्रकृती स्थिर असल्याचा अहवाल न्यायालयात दिला आहे. दरम्यान शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी ‘ईडी’कडून पार्थ चॅटर्जी यांना चौदा दिवसांची कोठडीची मागणी करण्यात आली आहे.