
एप्रिलपासून दहावी, बारावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता बोर्डाच्या परीक्षा शाळास्तरावर घेण्यात याव्यात अशी मागणी पुन्हा एकदा शिक्षकांनी केली आहे. या मागणीचे पत्र शिक्षक संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले असून अभ्यासक्रम 50 टक्के कमी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
कोरोनाच्या फैलावामुळे शाळांमधून अध्यापन पूर्णपणे झालेले नाही. अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी दहावीची परीक्षा कसे देतील याची चिंता पालक तसेच शिक्षकांना लागली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. याकरिता दहावीचा अभ्यासक्रम 50 टक्के कमी करून शालेय स्तरावर परीक्षा घेण्याची परवानगी देण्यात यावी, असे शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी स्पष्ट केले.
शाळेत येण्याच्या सक्तीमुळे शिक्षक कोरोनाबाधित
मुंबईत काही शाळा दहावीच्या विद्यार्थ्यांना रोज किंवा दिवसाआड शाळेत बोलवत आहेत. शिक्षण विभागाचे आदेश नसतानाही शाळांच्या या सक्तीमुळे काही ठिकाणी शिक्षक कोरोना बाधित झाले आहेत, अशा शाळांना शिक्षण विभागामार्फत तातडीने सूचना द्याव्यात, असेदेखील दराडे यांनी स्पष्ट केले.
लसीकरण पूर्ण झाल्यावरच शाळा सुरू करावी
शालेय शैक्षणिक वर्ष 2020-21 चे काही दिवसच शिल्लक असल्याने पहिली ते आठवीचे वर्गही शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोविड लसीकरण पूर्ण करूनच येत्या जून महिन्यापासून सुरू करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.


























































