
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
आयपीएल स्पर्धा गाजवणारे युवा क्रिकेटपटू अष्टपैलू कृणाल पांड्या आणि मध्यमगती गोलंदाज दीपक चहर याना इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाने बोलावणे धाडले आहे. जखमी फिरकीवीर वॉशिंग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्या जागी इंग्लंडविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेत खेळण्याची संधी कृणाल आणि चहरला मिळू शकते. या दोघांनाही इंग्लंडविरुद्ध इंडिया कॅप मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात तीन टी-२० आणि तीन वनडे लढती खेळणार आहे. कृणाल आणि दीपक याचा टी-२० संघात समावेश करण्यात आल्यानंतर डावखुरा फिरकीवीर अक्षर पटेल याला हिंदुस्थानी वनडे संघात वॉशिंग्टन सुंदरच्या जागी खेळविण्याची घोषणा बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने केली आहे.




























































