गोलंदाजांमुळे हिंदुस्थानचे कमबॅक;  न्यूझीलंडला पहिल्या डावात 249 धावांत रोखले

पहिल्या डावात 217 धावांत गारद झालेल्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या पाचव्या दिवशी सॉल्लीड कमबॅक केले. मोहम्मद शमी, इशांत शर्मा या वेगवान गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडला पहिल्या डावात 249 धावांत रोखले. त्यामुळे केन विल्यमसनच्या न्यूझीलंडला पहिल्या डावात 32 धावांचीच आघाडी घेता आली.

wtc-final-ishant-sharma-bowling

न्यूझीलंडने 2 बाद 101 या धावसंख्येवरून मंगळवारी पुढे खेळायला सुरुवात केली. पण उपहारापर्यंतच्या सत्रात न्यूझीलंडला 23 षटकांमध्ये फक्त 34 धावाच करता आल्या. या कालावधीत त्यांनी तीन बळीही गमावले. हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमुळे केन विल्यमसन व रॉस टेलरसारखे अनुभवी फलंदाजही दबावाखाली खेळत होते. अखेर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर रॉस टेलर शुभमन गिलकरवी 11 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर इशांत शर्माने हेन्री निकोल्सला सात धावांवर रोहीत शर्माकरवी झेलबाद केले. यानंतर मोहम्मद शमीने बी.जे. वॉटलिंगचा (1 धाव) अफलातून चेंडूवर त्रिफळा उडवला.

wtc-final-virat-celebration

विल्यमसनची झुंज

न्यूझीलंडचे फलंदाज एकामागोमाग एक असे पॅव्हेलियनमध्ये परतत असताना कर्णधार केन विल्यमसन याने एका बाजूने किल्ला लढवला. त्याने संयमी फलंदाजी केली. पण त्याचे अर्धशतक एक धावेने हुकले. केन विल्यमसनने 177 चेंडूंत सहा चौकारांसह 49 धावा केल्या. इशांत शर्माच्या गोलंदाजीवर तो स्लीपमध्ये उभ्या विराट कोहलीकरवी झेलबाद झाला.

wtc-final-indian-team-balling

जेमिसन, साउथीची महत्त्वपूर्ण खेळी

न्यूझीलंडच्या पहिल्या डावात काईल जेमिसन (21 धावा) व टीम साउथी (30 धावा) या तळाच्या फलंदाजांनी महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडला पहिल्या डावात 32 धावांची आघाडीही घेता आली. हिंदुस्थानकडून मोहम्मद शमीने 76 धावा देत चार फलंदाजांना बाद केले. इशांत शर्माने 48 धावा देत तीन आणि रविचंद्रन अश्विनने 28 धावा देत दोन फलंदाज बाद केले.

आपली प्रतिक्रिया द्या