
सामना ऑनलाईन । अॅडलेड
विराट कोहलीच्या नेतृत्वात 46पैकी 26 कसोटींमध्ये विजय… मायदेशातील गेल्या 15पैकी 11 कसोटींमध्ये विजय… मात्र इंग्लंड व दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये निराशाजनक कामगिरी… हिंदुस्थानचा क्रिकेट संघ याच पार्श्वभूमीवर 6 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत भिडणार आहे. यावेळी 70 वर्षांचा काळा इतिहास पुसून टाकण्यासाठी विराट कोहलीची सेना जिवाचे रान करताना दिसेल. या कालावधीत टीम इंडियाने कांगारूंच्या देशात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही.
स्मिथ, वॉर्नर नसल्याचा फटका
हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाकडून आगामी मालिकेत बऱयाच अपेक्षा बाळगल्या जात आहेत. याला कारणेही आहेत. डेव्हिड वॉर्नर व स्टीवन स्मिथ हे त्यांचे दोन प्रमुख खेळाडू सध्या संघात नाहीत. बॉल टॅम्परिंग प्रकरणात ते शिक्षा भोगत आहेत. त्यानंतर गेल्या 26पैकी 12 कसोटींमध्ये कांगारूंना पराभवाचा सामना करावा लागलाय. हिंदुस्थानकडे भुवनेश्वरकुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा यांच्या रूपात प्रतिस्पर्ध्यांचे 20 गडी बाद करणारे गोलंदाज आहेत. या सर्व बाबींमुळे टीम इंडियाला इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी आहे.
आफ्रिकेचे निर्भेळ यश
गेल्या काही वर्षांमधील कसोटी मालिकांवर नजर टाकल्यास दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियात संस्मरणीय कामगिरी केलीय हे प्रकर्षाने दिसून येईल. दोन देशांमधील सात मालिकांपैकी तीनमध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी मारलीय. 1990च्या आधी वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियात वर्चस्व गाजवले होते.
आशिया खंडातील पहिल्या देशाचा मान
आशिया खंडातील एकाही देशाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत हरवलेले नाही. हिंदुस्थानचा संघ 1932 सालापासून तर पाकिस्तानचा संघ 1952-53 सालापासून क्रिकेट खेळतोय. पाकिस्तानने तीन वेळा ऑस्ट्रेलियाला बरोबरीत रोखलेय. तसेच फक्त चार कसोटींमध्ये विजय मिळवलेत. हिंदुस्थानने दोन वेळा ऑस्ट्रेलियाला बरोबरीत रोखले असून तेथे झालेल्या 44पैकी पाचच कसोटींमध्ये विजय मिळवलेत. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात हिंदुस्थानी संघाने 2003-04 सालामध्ये कसोटी मालिका 1-1 अशा बरोबरीत राखली होती. ही हिंदुस्थानची सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. विराटच्या ब्रिगेडने आगामी मालिका जिंकल्यास ऑस्ट्रेलियात मालिकेवर शिक्कामोर्तब करणारा पहिलाच देश ठरणार आहे.
कोहली हेच आमचे टार्गेट
हिंदुस्थानची फलंदाजी ही क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम आहे, यात वादच नाही. मात्र, विराट कोहलीला लवकर बाद केल्यास त्यांच्यावर दबाव येत असतो. त्यामुळे कोहली हेच आमचे मुख्य लक्ष्य असेल, असा इशारा ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार जोश हेजलवूडने दिला आहे. हेजलवूड म्हणाला, ‘कसोटी मालिकेत साहजिकच ‘रन मशीन’ असलेल्या कोहलीला आम्ही टार्गेट करू.
नंबर वन रँकिंग पणाला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत हिंदुस्थानचे नंबर वन स्थानही पणाला लागले आहे. टीम इंडियाला पहिले स्थान कायम राखण्यासाठी चार कसोटींपैकी किमान एक सामना ड्रॉ राखणे गरजेचे आहे. हिंदुस्थानकडे सध्या 116 पॉइंट असून ऑस्ट्रेलियाकडे 102 पॉइंट आहेत. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 4-0 अशा फरकाने जिंकल्यास त्यांना पहिल्या स्थानावर झेप घेता येणार आहे.





























































