IND Vs NZ Final – “हिंदुस्थानने क्रिकेट बरबाद केले…”, T-20 विश्वचषकातील टीम इंडियाच्या वर्चस्वावरून शोएब अख्तरचा जळफळाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा जळफळाट झाल्याचं पाहायला मिळालं. हिंदुस्थानच्या वाढत्या प्रभावावर आणि टी-२० विश्वचषकातील त्यांच्या कामगिरीवर अत्यंत कडू शब्दांत टीका केली आहे. शोएब अख्तर हिंदुस्थानची तुलना एका “श्रीमंत मुलाशी” करताना अख्तर म्हणाला की, “हे एखाद्या श्रीमंत मुलासारखे आहे, जो गल्लीतील सर्व गरीब मुलांना एकत्र बोलावतो आणि म्हणतो, ‘चला क्रिकेट खेळूया.’ हिंदुस्थान सध्या आमच्याशी तेच करत आहे.” हिंदुस्थानच्या आर्थिक आणि राजकीय ताकदीमुळे क्रिकेटमधील स्पर्धात्मकता संपली असून त्यांनी हा खेळ पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप अख्तरने केला आहे.

स्पर्धेच्या फॉरमॅटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अख्तरने केवळ वर्चस्वावरच नाही, तर विश्वचषकाच्या रचनेवरही संशय व्यक्त केला आहे. तो म्हणाला की, हिंदुस्थान आपल्या सोयीनुसार संघांची निवड आणि खेळाचे नियोजन करतो. “आठ संघांपैकी ते चार संघ ठेवतात, त्या चारपैकी पुन्हा तीन निवडून पुढे नेतात आणि शेवटी ‘बघा आम्हीच जिंकलो’ असा डांगोरा पिटतात,” असे सांगत त्याने आयसीसीच्या स्पर्धा पद्धतीवरही निशाणा साधला. हिंदुस्थानच्या या ‘एकतर्फी’ विजयांमुळे क्रिकेटमधील थरार कमी झाल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे.

फायनलचा थरार सुरू होण्यापूर्वीही त्याने न्यूझीलंडला पाठिंबा दर्शवला होता. तेव्हा तो म्हणाला की, जरी हिंदुस्थान बलाढ्य वाटत असला तरी त्यांच्यावर १.५ अब्ज देशवासियांच्या अपेक्षांचे प्रचंड ओझे आहे. अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवाची आठवण करून देत त्याने हिंदुस्थानला सावध केले. “क्रिकेटच्या हितासाठी आता न्यूझीलंडने हा विश्वचषक जिंकण्याची वेळ आली आहे,” असे म्हणत त्याने न्यूझीलंडला पाठिंबा दर्शवला. हिंदुस्थानचे सततचे वर्चस्व खेळासाठी घातक असल्याचे संकेतही त्याने या निमित्ताने दिले होते.

IND vs NZ Final: ‘प्रशिक्षक साहेब, हे हास्य तुमच्यावर…’, धोनीची पोस्ट व्हायरल; गंभीरनेही दिले भन्नाट उत्तर