
काल तळंदाजांनी केलेल्या खडूस फलंदाजीमुळे मुंबईचा फायनल प्रवेश निश्चित झाला होताच, तर त्यावर शिक्कामोर्तबही केले. मुंबईने आज आपली आघाडी 232 धावांपर्यंत ताणल्यानंतर तामीळनाडूचा दुसरा डाव अवघ्या 162 धावांतच गुंडाळण्याची किमया साधली आणि आणखी एक सामना डावाने जिंकला. त्याचबरोबर रणजी करंडकाच्या इतिहासात 48 व्यांदा अंतिम फेरीत धडक मारण्याचा भीमपराक्रम केला.
कालच्या 9 बाद 353 धावांवरून पुढे खेळ सुरू करणाऱया तनुष कोटियन आणि तुषार देशपांडेला सलग दुसऱया सामन्यात शतकी भागी रचण्याचा विश्वविक्रम रचण्याची संधी होती, पण ते 12 धावांनी कमी पडले. कालच्या धावसंख्येत 25 धावांची भर घातल्यानंतर तुषारचा अप्रतिम झेल साई सुदर्शनने टिपला आणि मुंबईच्या डावावर पूर्णविराम लावला. गेल्या सामन्यात नाबाद 120 धावा करणाऱया तनुषचे सलग दुसरे शतक ठोकण्याचे प्रयत्न अपुरे ठरले. तो 126 चेंडूंत 89 धावा करत नाबाद राहिला. म्हणजेच तनुषने सलग दोन डावांत नाबाद 209 धावा केल्या आहेत. मुंबईची 232 धावांची आघाडी तामीळनाडूच्या फलंदाजांना झेपलीच नाही आणि मुंबईच्या गोलंदाजांनी 51.5 षटकांतच पाहुण्यांचा दुसरा डाव 162 धावांतच उधळून लावला.
मुंबईचा डावाचा चौथा विजय
मुंबईसाठी हा मोसम खऱया अर्थाने अफलातून ठरला. गेल्या आठ सामन्यांपैकी पाच सामन्यांत विजय, दोन सामन्यांत पहिल्या डावात आघाडी आणि केवळ एका सामन्यात अनपेक्षित हार सहन करावी लागली होती. एका स्पर्धेत चार सामने डावाने जिंकण्याची किमया मुंबईने अनेक वर्षांनंतर केली आहे. मुंबईने आपल्या फायनलपर्यंतच्या प्रवासादरम्यान आंध्र प्रदेश, बंगाल, आसाम आणि आता तामीळनाडू यांच्या विरुद्ध डावाने विजय मिळवले.
तामीळनाडूचे घालीन लोटांगण…
पहिल्या डावात गडगडणारा तामीळनाडूचा संघ दुसऱया डावात मुंबईच्या गोलंदाजांचा यशस्वीपणे सामना करेल असे वाटत होते, पण पाहुण्यांनी पहिल्या डावाप्रमाणे दुसऱया डावातही सपशेल लोटांगण घातले. मुंबईच्या गोलंदाजांनी बीकेसी ग्राऊंडवरील आपली जोरदार कामगिरी या डावातही दाखवून दिली. काल झंझावाती शतक ठोकणाऱया शार्दुल ठाकूरने अवघ्या सहा धावांतच पाहुण्यांच्या साई सुदर्शन (5)आणि नारायण जगदीशनला (0) बाद केले आणि मुंबईला पुन्हा एकदा अपेक्षित सुरुवात करून दिली.
मग वॉशिंग्टन सुंदरही (4) मोहित अवस्थीचा बळी ठरला. 3 बाद 10 नंतर बाबा इंद्रजीतने (70) खणखणीत फटकेबाजी करत संघावरचे दडपण दूर करण्याचे प्रयत्न केले; पण तो बाद झाल्यावर तामीळनाडूचा डाव गुंडाळायला मुंबईला फार वेळ लागला नाही. 5 बाद 153 वर असलेल्या तामीळनाडूचे शेपूट शम्स मुलानी आणि कोटियनच्या फिरकीने अवघ्या 9 धावांत गुंडाळले.
मुंबईच्या यशात नदीम मेमन यांचीही कमाल
मुंबईच्या रणजी संघाच्या विजयी कामगिरीत सिंहाचा वाटा बीकेसी ग्राऊंडने उचलला. या मैदानावर खेळल्या चारही सामन्यांत मुंबईने अफलातून यश मिळवले. त्यामुळे मुंबईच्या विजयात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्युरेटर नदीम मेमन यांचाही खारीचा वाटा आहे हे मान्य करावेच लागले. त्यांच्यावर बीकेसीच्या पीचची जबाबदारी ऑगस्टमध्ये देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी बीकेसीच्या खेळपट्टीवर अशी काही जादुई हिरवळ उगवली की, मुंबईला या मैदानावर कुणीच हरवू शकला नाही. चार सामन्यांतील यशाने मुंबईचे सारे क्रिकेटपटू अक्षरशः बीकेसीच्या प्रेमात पडले आहेत. खरं सांगायचं तर, वानखेडेपेक्षा त्यांना बीकेसीवर खेळणंच जास्त सोप्पं वाटतंय. ही सारी जादुई कमाल मेमन यांनी बनवलेल्या खेळपट्टीचीच म्हणावी लागेल.
रणजी फायनल नं. 48
रणजी करंडक स्पर्धेत मुंबईचा प्रत्येक विजय इतिहासच रचत असतो. मुंबईने आज तामीळनाडूचा धुव्वा उडवत रणजीच्या फायनलमध्ये 48 व्यांदा धडक मारली आहे. हासुद्धा एक विश्वविक्रमच आहे आणि या विक्रमच्या कुणी आसपासही पोहचू शकत नाही. रणजी करंडकाच्या 89 स्पर्धांपैकी चक्क निम्म्यापेक्षा अधिक म्हणजेच 48 स्पर्धांची अंतिम फेरी मुंबईने गाठलीय आणि त्यापैकी 41 स्पर्धेत विजेतेपदही पटकावले आहे. गेल्या सात वर्षांत मुंबईने दोनदा फायनल गाठली, पण ते एकदाही जिंकू शकलेले नाहीत. ही पहिलीच वेळ आहे की, मुंबई दोनदा अंतिम फेरीत पोहचूनही जिंकलेली नाही. मुंबईने 47 फायनलपैकी 41 जिंकलेत तर केवळ सहा स्पर्धांत ते उपविजेते ठरलेत. त्यापैकी दोनदा ते गेल्या सात वर्षांत हरलेत. मुंबईसाठी पराभवाची ही मालिका आता संपवावीच लागणार आहे.
रणजी करंडकाच्या इतिहासात सर्वाधिक 41 रणजी जेतेपदांनंतर नंबर लागतो कर्नाटकचा. त्यांनी आजवर आठ जेतीपदे जिंकली आहेत. तसेच सर्वाधिक 13 वेळा फायनल पराभवाला बंगालचा संघ सामोरा गेला आहे. त्यांनी 15 वेळा फायनल गाठली, पण जिंकले मात्र दोनदाच. तसेच यंदाच्या रणजी स्पर्धेत मुंबईला विदर्भचे आव्हान असण्याची शक्यता आहे आणि हा संघ आजवर एकही रणजी फायनल हरलेला नाही. म्हणजे ते दोनदा अंतिम फेरीत पोहोचलेत आणि दोनदाही अजिंक्य ठरलेत.





























































