
सामना प्रतिनिधी । मुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याबरोबरच उभ्या पुतळ्याची प्रतिकृती देण्याचा प्रस्तावही तांत्रिक समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या इतिवृत्तानुसार एल ऍण्ड टी कंपनीला या उभ्या पुतळ्याची प्रतिकृती सादर करण्यास सांगितले. त्यानुसार उभ्या पुतळ्याची प्रतिकृती तयारही करण्यात आली असून ही प्रतिकृती मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशावर उभ्या असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याप्रमाणेच आहे.
शिवस्मारकासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत एल ऍण्ड टी कंपनीला शिवस्मारकाचा संपूर्ण आराखडा 20 मार्चपर्यंत देण्यास सांगण्यात आले आहे. या विषयीचा आराखडा अद्याप अंतिम झालेला नाही. त्याचप्रमाणे पुतळ्याची रचनाही अंतिम झालेली नाही. तेव्हा पुतळ्याच्या तीन ते चार दोन फूट उंचीच्या प्रतिकृती तयार करण्यास एल ऍण्ड टी कंपनीला सांगण्यात आल्याचेही या इतिवृत्तात म्हटले आहे. या पुतळ्यामध्ये अश्वारूढ पुतळ्याचे तीन पर्याय असून यामध्ये दोन्ही टापांवर उधळलेला घोडा, एक टाप वर करून उभा असलेला घोडा, चारही पायांवर उभा असलेला घोडा तसेच चौथ्या पर्यायात घोडा नसून छत्रपती शिवाजी महाराजांची उभी दोन फुटांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या विषयीचे सादरीकरणही एल ऍण्ड टी कंपनीला करण्यास सांगितल्याचे इतिवृत्तावरून स्पष्ट होत आहे.

























































