तंत्रज्ञान क्रांती आणि हिंदुस्थान

>> बालेन्दु शर्मा दधिच

आगामी 20 ते 25 वर्षांत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या जनजीवनाचा अविभाज्य भाग बनलेला असेल. आपल्याकडे सध्या या क्षेत्रात पाऊल रोवून जगात हिंदुस्थानचा दबदबा निर्माण करण्याची मोठी संधी आहे. या तंत्रज्ञानामुळे रोजगार कमी होणार असला तरी आतापासूनच आपण आपल्या शिक्षणव्यवस्थेत या विषयाला महत्त्वाचे स्थान दिले, तर ज्यावेळी जगात हे तंत्रज्ञान सर्वव्यापी झालेले असेल तेव्हा त्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत हिंदुस्थानने आघाडी घेतलेली असू शकते.

दोन ते तीन दशकांपूर्वी चीनसमोर जी संधी उपलब्ध होती, तीच आज हिंदुस्थानसमोर उभी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन चीनने आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले आणि जगाचे ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ बनला. आज हिंदुस्थान जगाचे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब’ बनू शकतो. हिंदुस्थान सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित ‘रेझ-2020’ हे जागतिक संमेलन नुकतेच झाले. या संमेलनात शेकडो तज्ञांनी भाग घेतला आणि लाखो लोकांनी हे संमेलन ऑनलाइन पाहिले. या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना ‘सामाजिकदृष्टय़ा जबाबदार आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अशी होती; परंतु जगात निर्माण होत असलेल्या या अद्भुत संधीचा वापर हिंदुस्थान घेऊ शकतो का आणि त्यायोगे सामाजिक-आर्थिक उन्नतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करू शकतो का, यावरच या संमेलनात लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

यंत्रांमध्ये किंवा तंत्रज्ञानामध्ये माणसासारखीच शिकण्याची, विश्लेषण करण्याची, विचार करण्याची, एखादी गोष्ट समजून घेण्याची, समस्यांचे निराकरण करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात पृत्रिम बुद्धिमत्तेचा वास्तविक अर्थ आहे. जेव्हा यंत्रांमध्ये मानवासारख्या क्षमता येण्याची चाहूल लागते तेव्हा आनंदही होतो आणि भीतीही वाटते. आनंद या गोष्टीचा वाटतो की, आपल्याकडे आता अनेक लोकांचे काम करणारे एकच यंत्र असेल आणि कामही उच्च दर्जाचे होईल. भीती या गोष्टीची वाटते, की अशी यंत्रे आल्यावर माणसाचे काय होईल? तो काय करेल? कसे कमावेल आणि पुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करेल? सर्वांत मोठी भीती अशी की, माणसाप्रमाणे विचार करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त झालेली यंत्रे दीर्घकाळासाठी माणसाच्या ताब्यात राहतील याची हमी कोण देणार? यातल्या एखाद्दुसऱया यंत्राने जरी पुठेतरी बॉम्ब टाकण्यासारखे किंवा एखादी प्रणाली नष्ट करण्यासारखे एखादे गैरकृत्य केले

तर आपल्या जगाचे काय होईल?
एकीकडे भीती आणि एकीकडे आनंद अशा वातावरणात आज आपण विचार करतो आहोत की, आता आपल्याकडे माणसाचे काम हलके करणारी यंत्रे असणार आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण अशी यंत्रे आणि प्रणाली तयार करणार आहोत. या प्रणाली आणि यंत्रे सर्व कामे अत्यंत जलदगतीने करतील. संसाधनांवर होणारा खर्च कमी करतील आणि व्यवसायातील फायदा कितीतरी पटींनी वाढवतील. उदाहरणार्थ, कामगारांच्या मदतीने चालविण्यात येणाऱया स्पूटरच्या एखाद्या कारखान्यात रोज एक हजार स्पूटर तयार होतात. तोच कारखाना जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून चालविला गेला तर कदाचित तेथे दहापट स्पूटर तयार होऊ लागतील आणि कामगारांवरील खर्च दहा टक्क्यांवर येईल. म्हणजेच दहा टक्के खर्चात एक हजारपट काम! हे ऐपून सामान्यतः मनात एक सवाल निश्चित येत असेल. आपला देश तर कामगार आणि शेतकऱयांचा देश आहे. अशा प्रकारे जर कामगार बेरोजगार होत राहिले तर बेरोजगारांची इतकी मोठी फौज तयार होत राहील, की अर्थव्यवस्था निश्चित रसातळाला जाईल.

ही भीती निराधार निश्चितच नाही; परंतु आता आपण गेल्या आठवडय़ात झालेल्या संमेलनाकडे वळूया. कारण त्यामुळेच ही गोष्ट बऱयापैकी स्पष्ट होऊ शकेल. पंतप्रधानांनी सांगितले की, आम्ही हिंदुस्थानला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ग्लोबल हब बनवू इच्छितो. याचा अर्थ असा झाला की, आपण केवळ आपल्याकडे अशा प्रकारची यंत्रे आणि प्रणाली विकसित करणार नसून, अशा प्रणालींची आणि उत्पादनांची निर्मिती आपण संपूर्ण जगासाठी करणार आहोत. यामुळे आपल्याला एवढी मजबुती मिळेल, जेवढी मॅन्युफॅक्चरिंग हब बनल्यामुळे चीनला मिळाली होती. चीनप्रमाणेच हिंदुस्थानातही श्रम स्वस्त आहेत; परंतु चीनपेक्षा हिंदुस्थान उत्पादनामधील गुणवत्तेसाठी अधिक ओळखला जातो. आज चीन ज्याप्रमाणे छोटय़ा-छोटय़ा वस्तूंपासून मोठय़ात मोठय़ा वस्तूंपर्यंत सर्व उत्पादने करीत आहे, त्याप्रमाणे आपण आर्टिफिशिल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात हिंदुस्थानचा दबदबा निर्माण करू शकतो. असे झाल्यास आपला आर्थिक कायापालट होईल.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात ज्या प्रमाणात संधी आहेत, त्या प्रमाणात प्रज्ञा आणि पुशल लोक उपलब्ध नाहीत. या बाबतीत हिंदुस्थानला मोठा लाभ होऊ शकतो अशी स्थिती आहे. जगात स्टेम विषयांत (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग आणि गणित) पदवीधर बाहेर पडण्याची संख्या हिंदुस्थानात सर्वाधिक आहे. वर उल्लेख केलेल्या संमेलनात एका सत्रातून असा निष्कर्ष निघाला की, हिंदुस्थानात पुशल तज्ञांची उपलब्धता, डेटाचा आकार, कनेक्टिव्हिटीची सुगमता, युवकांची मोठी संख्या, सरकारचा जोश आणि हिंदुस्थानविषयी जगाला वाटणारा विश्वास या आधारावर आपण हनुमानउडी घेऊ शकतो.

अर्थात या मार्गावर आव्हानेही तितकीच मोठी आहेत. उदाहरणार्थ, आपल्या देशात शिक्षणाचा स्तर जेवढा अपेक्षित आहे, तेवढा उच्च आहे का? सध्या तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात नोकऱया कमी असल्यामुळे युवकांना आकर्षित करणे अवघड आहे. याखेरीज जागतिक स्तरावर मोठे भवितव्य घडविण्यासाठी मायक्रोसॉफ्ट, गुगल, फेसबुक यांच्या तोडीच्या विशालकाय पंपन्या आपल्याकडे असणे आवश्यक आहे. अशा पंपन्यांच्या निर्मितीच्या बाबतीत आपला इतिहास फारसा उत्साहवर्धक नाही; परंतु तरीही आजमितीस हिंदुस्थानकडे मोठी संधी आहे, जेणेकरून 20 ते 25 वर्षांनी जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या जनजीवनाचा, व्यवसायाचा, सरकारी कामकाजाचा, सेवांचा अविभाज्य भाग बनलेला असेल, तेव्हा त्यासाठीच्या बहुतांश उपकरणांवर ‘मेड इन इंडिया’चा, ‘पॉवर्ड बाय इंडिया’चा किंवा ‘प्रोसेस्ड इन इंडिया’चा शिक्का असावा हे स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. ही एक ऐतिहासिक संधी आहे. तिचा वापर करायचा की ती गमवायची याचा निर्णय आपल्याच हाती आहे.

शिक्षणात आर्टिफिशियल इंटेलिजन्स
इन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्का यांनी जे सांगितले होते ते आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्यांनी म्हटले होते की, पुढील 20 ते 25 वर्षांत आर्टिफिशियल इंटेलिजन्स हिंदुस्थानात बरीच मोठी खळबळ उडवून देईल अशी त्याची क्षमता आहे. आज आधुनिकीकरणामुळे लोक ज्याप्रमाणे नोकऱया गमावत आहेत, ते पाहता पुढील काळाच्या तुलनेत सध्या नोकऱया गमावण्याचा वेग काहीच नाही. परंतु आपल्याकडे बराच वेळ आहे आणि आपण स्वतःला त्या परिस्थितीसाठी तयार करू शकतो. आपण आपल्या शिक्षणप्रणालीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश अशा प्रकारे करू शकतो, जेणेकरून या तंत्रज्ञानातील तज्ञ मोठय़ा संख्येने तयार होऊ शकतील. असे झाल्यास आपल्याकडे कुशल लोकांची फौज असेल आणि मग आपले नशीब पालटू शकते.
(लेखक प्रख्यात आयटी तज्ञ आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या