
उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भरपूर स्तुती करताना त्यांची तुलना थेट भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीराम यांच्याशी केली आहे. मुख्यमंत्री रावत यांनी हरिद्वार मधील कुंभमेळा संदर्भातील कार्यक्रमात भाषण करताना मोदी यांच्यावर अफाट स्तुतीसुमने उधळली. हरिद्वारमध्ये नेत्र कुंभची सुरुवात करण्यासाठी रविवारी आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री रावत यांनी पंतप्रधान मोदींचे अपार कौतुक केले. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रतिमा उंचावली आहे, आज अनेक मोठ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष मोदी यांना भेटण्यासाठी रांगेत उभे असतात असे वक्तव्य रावत यांनी केले.
त्रेता आणि द्वापर युगामध्ये जसा भगवान राम आणि भगवान कृष्ण यांनी अवतार घेतला होता, त्याच प्रकारे येणाऱ्या कालावधीमध्ये पंतप्रधान मोदी यांना लोकं लक्षात ठेवतील असे रावत यांनी आपल्या भाषणात म्हटले. तीरथसिंह रावत हे उत्तराखंडमधील पौड लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार आहेत.
जनतेची कामे करणारा लोकप्रतिनिधी म्हणून मोदी यांनी जनतेवर कधीही न पुसता येणारी छाप सोडल्याचे रावत यांनी यावेळी सांगितले. मोदींच्या कामाकडे पाहूनच ‘मोदी है तो मुमकिन है’ असे म्हटले जाते असे रावत म्हणाले. गेल्या आठवड्यात तीरथ सिंह रावत यांनी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी झालेल्या भाजपच्या बैठकीत तीरथ सिंह रावत यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला.



























































