तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबन रद्द, शासकीय खुर्चीत बसून गायले होते गाणे

आपल्या निरोप समारंभाच्या वेळी शासन नियमांचे उल्लंघन करुन खुर्चीवर बसून उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी तेरे जैसा यार कहा हे गाणे म्हटल्यानंतर त्याविरुध्द झालेल्या तक्रारीमुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. लातूरमधील रेणापूर येथे ते रुजू झाल्यानंतर त्यांच्या निलंबनाचे आदेश विभागीय आयुक्तांनी काढले होते. त्यानंतर त्यांनी केलेल्या विनंतीवरुन त्यांना समज देऊन पुन्हा त्यांचे निलंबन मागे घेत रेणापूरचे तहसीलदार पद बहाल करण्यात आले आहे.

उमरी जि. नांदेड येथील तहसीलदार प्रशांत थोरात यांची रेणापूर येथे बदली झाली होती. 8 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय उमरी येथे आयोजित निरोप समारंभाच्यावेळी आपल्या शासकीय खुर्चीत बसून त्यांनी निरोप समारंभाच्या वेळी तेरे जैसा यार कहा हे गाणे म्हटले होते. उपस्थितांनी त्याला दादही दिली होती. महाराष्ट्र नागरी शिस्त व अपिल नियम १९८९ मध्ये नियम ४,१ अ नुसार ही कृती बेकायदेशीर असल्याने त्याबाबतच्या तक्रारी विभागीय आयुक्तांकडे गेल्या होत्या. त्यासंदर्भातील जिल्हाधिकारी नांदेड यांचा अहवाल मागविण्यात आला होता. १६ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्तांनी शिस्तभंग केल्याबद्दल प्रशांत थोरात यांना निलंबित केले. दरम्यान प्रशांत थोरात यांनी 20 ऑगस्ट रोजी शासनास पत्र लिहून आपले निलंबन रद्द करण्याची विनंती केली होती. थोरात यांचे निवेदन व त्यांचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे.

या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल नियमानुसार आपले निलंबन करण्यात आले होते. मात्र आपण दिलेल्या खुलाशानंतर व विनंतीनंतर आपले निलंबन रद्द करण्यात आल्याचे महाराष्ट्र शासनाच्या अव्वल सचिव प्रविण पाटील यांनी जारी केलेल्या पत्रात म्हंटले आहे. यापुढे भविष्यात कार्यालयीन काम करताना महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचा भंग होणार नाही याची खबरदारी आपण घ्यावी, त्या अटीवर आपले निलंबित रद्द करण्यात येत असून आपण रेणापूर येथे तहसीलदार म्हणून पदभार स्विकारावा तसेच आपली विभागीय चौकशीची कारवाई देखील रद्द करण्यात येत आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.