प्रायव्हेट ‘तेजस’ने साईदर्शनाला चला! मुंबई ते शिर्डी व्हाया पुणे एक्प्रेस धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद-मुंबई मार्गावर सुरू झालेल्या प्रायव्हेट ‘तेजस एक्प्रेस’ची सर्व तिकिटे हातोहात संपली असून तिला मिळालेल्या बंपर यशानंतर आता मध्य रेल्वेची सीएसएमटी-पुणे – शिर्डी मार्गावर तिसरी प्रायव्हेट तेजस चालविण्याचा प्रस्ताव आयआरसीटीसीने रेल्वे मंत्रालयासमोर मांडला आहे.

दिल्ली-लखनौ मार्गावर पहिली खासगी ‘तेजस’ सुरू केल्यानंतर दुसरी तेजस ‘परे’वर 19 जानेवारीपासून मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आली आहे. ‘तेजस’ सुटण्याच्या वेळेत अहमदाबाद मार्गावर जाणाऱया तीन-तीन ट्रेन असताना या गाडीला प्रवासी मिळतील की नाही या विवंचनेत रेल्वे अधिकारी होते, परंतु ‘तेजस’ची पहिल्या प्रायोगिक फेरीपासून सर्व तिकिटे संपल्याने हा प्रयोग यशस्वी ठरल्याचा दावा आयआरसीटीसीने केला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते शिर्डी व्हाया पुणे मार्गावर तिसरी प्रायव्हेट ‘तेजस’ चालविण्याचा प्रस्ताव आयआरसीटीसीने मांडल्याचे आयआरसीटीसीचे पश्चिम विभागाचे समूह महाव्यवस्थापक राहुल हिमालियन यांनी दै. ‘सामना’शी बोलताना सांगितले.
आता ‘तेजस’मध्ये

‘पीव्हीआर’ सिनेमा

तेजस एक्प्रेसला मिळालेला प्रतिसाद पाहून या सहा-साडेसहा तासांच्या प्रवासात तुम्हाला थिएटरचा अनुभव मिळणार आहे. त्यासाठी ‘पीव्हीआर’ बोलणी सुरू असून अख्खा कोचच सिनेमागृहासारखा तयार करण्यात येणार आहे. ‘तेजस’ला सध्या 12 डबे असले तरी प्रवाशांची संख्या पाहून ते 18 पर्यंत वाढविणे शक्य असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

50 रुपयांत फूट मसाज करा

सध्या ‘तेजस’च्या प्रवाशांची पसंद नोंदविली जात असून नाश्ता -जेवणात विविध पदार्थांची चंगळच सुरू करण्यात आली आहे. त्यात बिर्याणीपासून डाळवडे, गरमागरम कांदेपोहे, श्रीखंड, जिलेबी, फाफडा अशा मुंबईकरांना आवडणाऱया पदार्थांची रेलचेल आहे. तसेच फूट मसाजसाठी अत्याधुनिक मसाज चेअर ठेवण्यात आली असून त्यासाठी 50 ते 100 रुपये आकारण्यात येत आहेत. तसेच क्रूज कंपनीचे व्हर्च्युअल थ्रीडी व्हिडीओही 50 रुपयांत प्रवाशांना पाहता येत आहेत.