Bihar Election : दु:ख, वेदना, जखमा, गुन्हेगारी, २० वर्षांनी बिहार बदलासाठी मतदान करेल – तेजस्वी यादव

बदलासाठी उत्सुक असलेले बिहार आता २० वर्षांनंतर बदलासाठी मतदान करेल. यावेळी देशातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असलेल्या राज्यात, तरुण बेरोजगारी संपवण्यासाठी मतदान करतील, असं वक्तव्य राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी केलं आहे. बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यावरच आपली प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत.

X वर एक पोस्ट करत तेजस्वी यादव म्हणाले आहेत की, “माझ्या प्रिय बिहारवासीयांनो २२ नोव्हेंबर २०२०, आपण सर्वांनी ही तारीख लक्षात ठेवली पाहिजे. भविष्यात जेव्हा जेव्हा इतिहासाची पाने उलटतील तेव्हा ही तारीख बिहारच्या सुवर्ण भविष्याची, बदलाची, विकासाची आणि प्रगतीची सुरुवात म्हणून नेहमीच सुवर्ण अक्षरात दिसेल. बदलाचा रणशिंग वाजला आहे, लोकांच्या विजयाचा शंख वाजला आहे. आता प्रत्येक बिहारीने आपलं हृदय आणि ऊर्जा एकवटून महाआघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र यावं.”

तेजस्वी यादव यांनी पुढे लिहिलं की, “बदलासाठी उत्सुक असलेला बिहार आता २० वर्षांनंतर बदलासाठी मतदान करेल. यावेळी, देशातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असलेल्या राज्यात, तरुण बेरोजगारी संपवण्यासाठी मतदान करतील. बिहारमध्ये असे एकही घर उरणार नाही जिथे तरुण बेरोजगार राहतील. तेजस्वी सर्वांना सरकारी नोकऱ्या देतील. जे काम बिहार सरकार २० वर्षांत करू शकलं नाही, ते आम्ही २० महिन्यांत केलं आहे. जे काम हे सरकार २० वर्षांत करू शकलं नाही, ते आता आम्ही २० महिन्यांत करू. सर्वांच्या सहकार्यानं, आम्ही एक चांगला, विकसित आणि नवीन बिहार निर्माण करू.”

आपल्या पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिलं की, “बिहारने गेल्या २० वर्षात खूप काही सहन केलं आहे… दु:ख, वेदना, जखमा, गुन्हेगारी, हिंसाचार, गुंडगिरी, खून, दरोडा, चोरी, बलात्कार, मुझफ्फरपूर आश्रय गृह घटनेसारखं भयानक गुन्हे, लाचखोरी, भ्रष्टाचार, असंख्य घोटाळे, हक्कांवर गदा आणणे, सूक्ष्म वित्त कंपन्यांकडून व्याज आणि कर्जांवर गुंडगिरी, पेपर लीक, षड्यंत्र, आदेशांची चोरी, लाठीमार, चापट, अपमान, महिलांविरुद्ध अश्लील टिप्पणी, स्थलांतर, बेरोजगारी, महागाई, पूर, दुष्काळ, वीज, गारपीट, कुशासन, जीर्ण रुग्णालये आणि शाळा, रुग्णांच्या उपचारात निष्काळजीपणा, सायबर गुन्हे, जमीन हडपणे, अ‍ॅसिड हल्ले, पदवी फसवणूक, पूल कोसळणं, रस्ता कोसळणं, इमारत कोसळणं, मतांची चोरी, नोकरशाही, हुकूमशाही, जंगल राज आणि इतर कोणत्या आपत्ती आहेत कोणाला माहित?

तेजस्वी यादव म्हणाले की, “मी बिहारच्या सर्व जनतेचे आभार मानतो आणि तुम्हाला खात्री देतो की, तुमचं आणि आमचं सरकार स्थापन होताच, बिहार पहिल्या दिवसापासूनच बदलाची एक नवी गौरवशाली गाथा लिहिण्यास सुरुवात करेल. आज केवळ निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत तर बिहारचा उत्सव सुरू झाला आहे, हा उत्सव थांबू नये, दिवाळी आणि छठपूजेनंतर बिहारची वीस वर्षांची प्रतीक्षा संपेल. वीस वर्षांनंतर, असा भव्य उत्सव येईल जो सर्व दुःख आणि वेदना दूर करेल, त्या दिवशी प्रत्येक बिहारी तेजस्वीसह विजय स्वीकारेल, कारण त्या दिवशी प्रत्येक बिहारी १००% नवीन बिहारचा भाग्यनिर्माता होईल.”

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे, तर १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सोमवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी आणि दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांसाठी मतदान होणार आहे.