
शेतकऱयांना मोफत वीजपुरवठा, एकरी 10 हजार रुपये, मोफत पाणी आणि 5 लाख रुपयांचा विमा शिंदे-फडणवीस सरकारने दिल्यास मी महाराष्ट्रात पक्षबांधणीसाठी येणार नाही. मात्र या सरकारमध्ये दानत नाही, असा आरोप बीआरएस (भारत राष्ट्र समिती) पक्षाचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी लोहा येथील जाहीर सभेत केला.
‘मी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आलो आणि भारत राष्ट्र समिती पक्षाची नांदेड येथे सभा झाली. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याबद्दल बोलताना केसीआर यांनी तेलंगणा सोडून महाराष्ट्रात येण्याची गरज काय, असे विधान केले, परंतु हा देश माझा आहे आणि देशात मी कुठेही जाऊ शकतो’, असे चंद्रशेखर राव म्हणाले.


























































