तेलगू अभिनेत्रीला अटक, मैत्रीणीच्या घरी सोनं चोरल्याचा आरोप

प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्युएन्सर सौम्या शेट्टी हिच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सौम्या शेट्टीला विशाखापट्टनम पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. या बातमीने अभिनेत्रीचे चाहते अवाक झाले आहेत.

भारतीय टपाल विभागातून निवृत्त झालेले प्रसाद बाबू यांनी त्यांच्या घरातून 150 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा तपास करत सौम्या शेट्टीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार दाखल करणाऱ्या प्रसाद बाबू यांची मुलगी मोनिका ही सौम्याची मैत्रिण होती. आणि सौम्या अनेकदा तिच्या मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी जात असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौम्याने संधी मिळताच ही चोरी केली. दागिने चोरीला गेल्याची माहिती मोनिकाच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रार दाखल झाल्यानंतर फॉरेन्सिक तपासात तिचे फिंगरप्रिंट आणि सीसीटिव्ही फुटेज घेतले होते. ज्यानंतर संशयास्पद लोकांची चौकशी केली होती. याच लोकांमध्ये सौम्याचे नावही होते. सौम्याची कसून चौकशी केली असता तिने चोरी केल्याचे मान्य केले. पोलिसांच्या माहितीनुसार चोरीनंतर सौम्या गोव्याला गेली होती आणि तिथे मजा करत होती. पोलिसांनी सौम्याकडून काही सोने जप्त केले आहे असून पुढील तपास सुरु आहे.