“प्रारब्धकर्माचे फल हे भोगलेच पाहिजे !”

>> निळकंठ कुलकर्णी

।। श्री गुरुदेव दत्त ।।

।।  श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।

श्री दत्तप्रभूंचे अनुशासन फार कडक होते. आज्ञेचे पालन काटेकोरपणे झाले नाही की, लगेच शिक्षा होत असे. आजारपण आले तरी देवाच्या आज्ञेनेचे घेतले तर औषध घ्यायचे. तेही वैद्याकडील शुद्धच घायचे. एकदा महाराजांना ज्वराचा त्रास सुरू झाला तो बरेच दिवस चालू राहिला. त्या वेळी श्वशूर बाबाजीपंत गोडे यांनी आग्रहाने बळेच महाराजांना  ‘हे वैद्याकडचे शुद्ध औषध आहे ‘ असे खोटे सांगून घ्यायला लावले. झाले! महाराजांना लगेच जोराची वांती होऊन ते निशेष्ट होऊन पडले. सर्वजण घाबरले बाबाजीपंतांनी खोटे सांगितल्याबद्दल देवाची क्षमा मागितल्यावरून महाराज उठून बसले. नंतर स्नान करून प्रायश्चित्त  म्हणून पंचगव्य घेऊन पवमानाच्या आवृत्या केल्या. असेच एकदा मुंबईचे शास्त्रीबुवा आले असता त्या वेळी महाराजांना होत असलेल्या मलावरोधासाठी तूप खाण्याचा सल्ला दिला. त्या प्रमाणे एक दिवस बुवांनी तूप खाल्ले. मात्र की महाराजांना अतिसाराचा तीव्र उपद्रव सुरू झाला तो पुढे वर्षभर चालू होता.

त्यामुळे सारखे स्नान करावे लागे. अशक्तपणा एवढा आला की चालणेही कठीण झाले. तशांतच नारायणस्वामींच्या उत्सवासाठी वाडीला जाण्याची देवांची आज्ञा झाली. महाराज गावांतून बाहेर पडून मार्गस्थ होतांच एक मनुष्य भेटला व त्यांनी त्यांची ती अवस्था पाहून त्यांना अतिसारावर औषध दिले. तेव्हा ते घ्यावे न घ्यावे असा विचार करीत असता देवांची औषध घेण्याची आज्ञा झाली. महाराज यावर देवांना म्हणाले “प्रारब्धकर्माचे फल हे भोगलेच पाहिजे आपल्याला औषधे नको. वाडीस जाऊन येईपर्यंत विकार बंद राहिला म्हणजे झाले, “पण देवांची स्पष्ठ आज्ञा औषध घेतलेच पाहिजे” अशी झाल्याने महाराजांनी औषध घेतले व वाडीतून परत येईपर्यंत अतिसार थांबला.

माणगांवी येतांच तो पुन्हा सुरू झाला. एके दिवशी देवांचे शब्द ऐकायला आले की “तूप खाऊन बरे वाटेल की नाही ?” तेव्हा कुठे महाराजांना कळले की देवांच्या आज्ञेशिवाय तूप खाल्याची ही शिक्षा आहे. पुढे देवांच्या सांगण्याने दही खाल्याने अतिसार कमी झाला, तरी कोणा ब्राह्मणाने केलेल्या अभिचार प्रयोगाचे निमित्त होऊन तो आयुष्यभर महाराजांना सोसावा लागला.

मातु:श्रींचा महाराज अत्यंत आदर करीत. आई समोर दिसतांच साष्टांग नमस्कार करीत. कधीही त्यांची अवज्ञा करीत नसत. कधी कधी देवांच्या आज्ञे विरुध्द आईचा आग्रह झाला की, त्यांचा नाइलाज  होत असे. एकदा मातु:श्रीच्या तीव्र इच्छेने व इतर बंधूनी नकार दिल्याने महाराज त्यांच्या बरोबर महाशिवरात्रीसाठी गोकर्णाच्या यात्रेला देवांची आज्ञा नसतांनाही निघाले. देवांना हे न आवडून सावंतवाडीच्या वाटेवरच महाराजांना फुरसे (साप)चावून पाय चांगलाच सुजला व ठणकु लागला. महाराजांनी त्यावर देवाचे तीर्थ घेतले व समाधी लावणे हे उपाय केले.

त्याने थोडा उतार पडायचा. पण समाधी उतरली की पुन्हा वेदना वाढायच्या. कुणीतरी त्यावर लेप लावला. त्याने सूज आणि वेदना अधिकच तीव्र झाल्या. हा क्लेशदायक क्रम दोनतीन दिवस चालला. तो पर्यंत सावंतवाडीला मुक्काम झाला. शेवटी मुलाच्या वेदनांनी कष्टी होऊन आता काही महाशिवरात्रीच्या आधी गोकर्णाला जाणे होत नाही. असा विचार करून मातु:श्रींनी माणगांवी परतण्याचा निर्णय घेतला. माणगांवी परत येतांच स्वप्नांत देवांनी महाराजांना दुखावलेला पाय दाबून त्यांत घुसलेला दाताचा तुकडा काढून टाकला. एकदोन दिवसांनी पाय हळूहळू पूर्ववत ठीक झाला.

वरील प्रसंगानंतर मातु:श्रींनी वासुदेवाला देवाच्या आज्ञेविरुध्द काही आग्रह करायचा नाही, असा निश्यच केला. तरीही एकदा काही प्रसंगाने लाडू केले होते. आपल्या हाताचा लाडू वासुदेवाने थोडा तरी खावा, अशी त्या माऊलीची साहजिकच इच्छा झाली. मातृप्रेमाच्या आग्रहाखातर महाराजांनी लाडूचा तुकडा तोंडात टाकला. तेव्हा घास घशांतच अडकून त्यांचे डोळे पांढरे झाले. आईने पश्चात्तापाने देवांची क्षमा मागितली व पुन्हा मुलाला कोणतीही आग्रह करणार नाही, असे कबूल केले. तेव्हा कसा बसा तो घास घशाखाली जाऊन महाराजांना बरे वाटले.

उज्जयिनीला दंडग्रहणाचे वेळी श्री गुरुस्वामीच्या आग्रहाने देवांच्या आज्ञेविरुध्द मठभिक्षा घेतली. तेव्हांही महाराजांना अशाच उलट्या सुरू झाल्या. शेवटी गुरुस्वामींनी देवांची क्षमा मागून पुन्हा वासुदेवांना आपल्या आज्ञेविरुध्द काही सांगणार नाही, असे कबूल केल्यानंतर उलट्या थांबल्या.

([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या