विदर्भात रेडऍलर्ट; पारा 40 च्या पुढे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर

हवामान विभागाकडून तापमानाच्या प्रकोपासंदर्भात सामान्य (हिरवा रंग), सजग रहा (पिवळा रंग), सुरक्षेची तयारी करा (शेंदरी रंग) आणि आपातकालीन स्थितीचा सामना करा असा धोक्याचा इशारा (लाल रंग) असे संकेत रंग जारी केले जातात. गेल्या बुधवारी तापमानाचा वाढता आलेख बघता हवामान विभागाने ‘हाय ऍलर्ट’ अर्थात शेंदरी रंगाचा इशारा दिला होता, मात्र गुरुवारी संपूर्ण विदर्भावर उष्णतेची अवकळा बघता गुरुवारी रात्री ‘रेड ऍलर्ट’ जारी करत संपूर्ण प्रशासनाला उन्हापासून संरक्षण करणाऱ्या आपातकालीन स्थितीचा सामना करण्याचे आवाहन करण्यासोबतच नागरिकांनाही तीव्र धोक्याचा इशारा दिला आहे.

गुरुवारी या संपूर्ण मोसमातले सर्वाधिक तापमान संपूर्ण विदर्भात  नोंदवले गेले आहे. विशेष म्हणजे मे महिन्यापूर्वीच तापमानाने उन्हाळ्यातील उच्चांक गाठले असून जमेल तशी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुरुवारी अकोल्याचे या मोसमातील सर्वाधिक 46.3 अंश इतके तापमान नोंदवले गेले असून त्याखालोखाल ब्रह्मपुरी आणि वर्धा 45.5, चंद्रपूर 45.4, अमरावती 45, यवतमाळ 44.5 आणि नागपूर 44.3 अंश इतके मोसमातील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. वाशीमचे 43.8 आणि गडचिरोलीचे 43 अंश इतके तापमान राहिले असून या जिह्यांचेही या मोसमातील हे सर्वाधिक तापमान ठरले आहे. विदर्भात गोंदिया सर्वाधित कमी उष्णतामानाचा जिल्हा गुरुवारी ठरला असून गोंदियाचे तापमान 39.8 इतके होते. हवामान विभागाने 27 ते 29 मेपर्यंत तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतामानाचा हा काळ गांभीर्याने घेणे अपेक्षित ठरणार आहे.