आनंदाचे डोही…आनंद तरंग; प्रार्थनास्थळे उघडण्याच्या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील प्रार्थनास्थळे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर उघडली जाणार आहेत. त्यामुळे सर्वधर्मीय भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रार्थनास्थळे उघडण्याच्या सरकारच्या घोषणेचे स्वागत राज्यभरात ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत करण्यात आले.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याच्या दिवशी देवाचे, साईंचे प्रत्यक्ष दर्शन घडणार हा आनंद अवर्णनीय असल्याची प्रतिक्रिया शिर्डीतील साईभक्त परसूअण्णा जगताप यांनी दिली.

हिंदू भाविकांबरोबरच मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारसी आदी धर्मियांनीही सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. दिवाळीच्या पवित्र पर्वात मंदिरांमध्ये पुन्हा घंटानाद होणार, मशिदींमध्ये अजान होणार, चर्चमध्ये प्रे होणार, गुरुद्वारांमध्ये गुरुबाणी घुमणार आणि अग्यारींमध्ये चंदनाचा दरवळ पसरणार. आठ महिने घर आणि दुकानामध्येच नमाज अदा करणारे मोहम्मद अली रोडवरील इस्माईल मोहम्मद काझी यांनी सोमवारी पहिला नमाज मशिदीमध्येच अदा करणार असे सांगितले.

‘शिर्डी’त दररोज फक्त 6 हजार भाविकांना प्रवेश

शिर्डीतील साईबाबा मंदिरात पासशिवाय प्रवेश मिळणार नसून दररोज फक्त 6 हजार भाविकांनाच प्रवेश दिला जाणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. पास देण्याची व्यवस्था संस्थानच्या वतीने ऑनलाइन करण्यात येणार आहे.

मुंबादेवी मंदिराच्या गाभाऱयात फक्त पाच भक्तांनाच प्रवेश

मुंबादेवी मंदिराच्या गाभाऱयात फक्त पाच भक्तांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. शिवाय दर दोन तासांनी निर्जंतुकीकरणासाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. ठिकठिकाणी बॅरिकेडस् लावण्यात येणार असून प्रवेशद्वारावरही सॅनिटायझेशन टनेल उभारण्यात येणार आहे. भक्तांनी फक्त दर्शनासाठी यावे. कोणताही प्रसाद सोबत आणू नये, असे आवाहन मंदिर व्यवस्थापक हेमंत महाजन यांनी केले आहे.