मुंबई-गोवा महामार्गावर निगडेजवळ टेम्पो उलटला; सुदैवाने मनुष्यहानी टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा महामार्गावरील निगडे फाटा परिसरात भरधाव वेगातील मालवाहू टेम्पो उलटून अपघात झाला. मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. मात्र, गाडीतील इलेक्ट्रोनिक वस्तू आणि गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा टेम्पो जागृत मोटर्स या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकीचा आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जागृती ट्रान्स्पोर्टच्या मालकीचा टेम्पो मुंबई येथे इलेक्ट्रोनिक्स वस्तू घेऊन चिपळूणकडे जात होता. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा टेम्पो मुंबई गोवा महामार्गावरील निगडे गावाजवळ पोहचला. या दरम्यान टेम्पोच्या टायरचे नट सैल झाल्याने चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि तो टेम्पो रस्त्यातच उलटला. या अपघातातून चालक सुदैवाने बचावला.

मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसत आहे. ज्या ठिकाणी महामार्गाचे चौपदरीकरण झाले आहे. त्या ठिकाणी चालक भरधाव वाहने चालवत आहेत. भरधाव वेगातील वाहनांना अचानक ब्रेक लावण्याची वेळ आली तर भरधाव वाहने रस्त्यावर उलटून अपघात होत आहेत. काही ठिकाणी चौपदरीकरणाचे काम रखडल्याने पर्यायी मार्ग खड्ड्यात गेले आहेत. या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने काही वाहने अपघातग्रस्त होत आहेत.