
परळच्या महात्मा गांधी रुग्णालयातील कर्मचारी वसाहतीची तातडीने दुरुस्ती होणार असून तोपर्यंत त्यांना पर्यायी निवासस्थानांची व्यवस्थाही केली जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रालयात आज शिवसेना खासदार, आमदार यांच्याबरोबर झालेल्या विशेष बैठकीत हे आदेश दिले. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर शेकडो कर्मचाऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
परळमध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालयाशेजारीच असलेल्या महात्मा गांधी रुग्णालय हे कामगार विमा रुग्णालय असून त्याचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. मात्र कर्मचाऱयांसाठी असलेल्या वसाहतींची मोठी दुरवस्था झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि आमदार अजय चौधरी यांनी वसाहतीची दुरवस्था तसेच कर्मचारी, परिचारिका यांना भेडसावत असलेल्या अनेक समस्या आज झालेल्या बैठकीत आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. भविष्यात एखादी दुर्घटना होऊ नये यासाठी घरांची वेळीच दुरुस्ती करावी आणि तोपर्यंत कर्मचाऱयांना पर्यायी घरांची व्यवस्था केली जावी, अशी मागणी केली. आरोग्यमंत्र्यांनी या दोन्ही मागण्या तातडीने मान्य केल्या तसेच गांधी रुग्णालय राज्य सरकारच्या अधिपत्याखाली घेण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. या बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, राज्य कामगार विमा मंडळाचे आयुक्त, ईएसआयसीचे वरिष्ठ अधिकारी, रुग्णालयाचे अधिकारी आणि युनियनचे सुनील कदम आदी उपस्थित होते.






















































