प्राणिसंग्रहालयातील कामांसाठी दहा कोटींची तरतूद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाच्या डीपीआरमधील आवश्यक कामे हाती घेण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

महानगरपालिकेचे सिद्धार्थ उद्यान हे मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय आहे. या प्राणिसंग्रहालयाची जागा अपुरी पडत असून प्राण्यांच्या नैसर्गिक हालचालींवर बंधने येत आहेत. त्यामध्ये सुधारणा करण्याचे सेंट्रल झू ऑथरिटीने बजावले होते. मात्र, त्यानंतरही मनपाने कोणतीच सुधारणा केली नाही. त्यामुळे झू ऑथरिटीने २०१३ साली या प्राणिसंग्रहालयाची मान्यता स्थगित केली होती. त्यानंतर मनपाने झू ऑथरिटीला ५० कोटींचा मास्टर प्लान सादर केला. त्यातील ३० कोटींच्या कामास अंतिम मान्यताही देण्यात आली.

मात्र, चार वर्षे उलटली तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे झू ऑथरिटीने मनपाला नोटीस पाठवून हे प्राणिसंग्रहालय बंद का करण्यात येऊ नये, असे बजावले आहे. त्याची दिल्ली येथे सुनावणी झाली. महापौर घोडेले यांनी अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक घेतली. डीपीआरमधील आवश्यक कामांसाठी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करण्यात आली असल्याचे महापौर घोडेले यांनी स्पष्ट केले. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सहा कोटींची तरतूद करण्याचे ठरले होते. त्याऐवजी सफारी पार्कच्या कामास अजून उशीर असल्याने संरक्षण भिंतीचा निधी वळवून प्राणिसंग्रहालयाच्या कामासाठी आता १० कोटींची तरतूद बजेटमध्ये केली जाणार आहे. त्यासंदर्भात आयुक्तांना सूचना करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.