
हिंदुस्थानातील तिन्ही दलांतील 10 महिला अधिकारी आजपासून सागरीविश्व प्रदक्षिणा मोहिमेवर रवाना झाल्या. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून हिंदुस्थानी लष्कराचे स्वदेशी जहाज त्रिवेणीवरून या मोहिमेला सुरुवात झाली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्हर्च्युअलद्वारे या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. या मोहिमेत एकूण 10 महिला असून त्या पुढील 9 महिने समुद्रातील 26 हजार मैल अंतर पार करणार आहेत. या प्रवासात भूमध्य रेषेला दोनदा पार केले जाणार असून लीउविन, हॉर्न आणि गुड होपला प्रदक्षिणा घालणार आहेत.
सर्व प्रमुख महासागर, दक्षिण महासागर, तसेच ड्रेक पॅसेजला पार केले जाईल. सागरीविश्व प्रदक्षिणा घातल्यानंतर मे 2026 ला मुंबईत परतणार आहेत. या मोहिमेवर ज्या 10 महिला अधिकारी आहेत. त्यांच्यामध्ये लेफ्टनंट कर्नल अनुजा वरूडकर, स्क्वॉड्रन लिडर श्रद्धा पी राजू, मेजर करमजीत कौर, मेजर ओमिता दळवी, कॅप्टन प्राजक्ता पी. निकम, कॅप्टन दौली बुटोला, लेफ्टनंट कमांडर प्रियांका गुसाई, विंग कमांडर विभा सिंह, स्क्वॉड्रन लिडर अरवी जयदेव आणि स्क्वाड्रन लिडर वैशाली भंडारी आदींचा समावेश आहे.