खंडणीप्रकरणी दहा नक्षली समर्थकांना अटक

नक्षलवादी असल्याचे सांगून बांधकाम पंत्राटदाराकडून 70 लाख रुपयांची खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 10 नक्षल समर्थकांना अहेरी तालुक्यातील पेरमिली पोलिसांनी अटक केली आहे. चैनू आत्राम (39), दानू आत्राम (29), शामराव वेलादी (45), संजय वेलादी (39), किशोर सोयाम (34), बाजू आत्राम (28), मनिराम आत्राम (45), जोगा मडावी (50), लालसू तलांडे (30),  बजरंग मडावी (40) अशी आरोपींची नावे आहेत.

नक्षल्यांच्या वेशभूषेत काही जणांनी 5 नोव्हेंबरच्या रात्री बांडिया नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामस्थळी जाऊन तेथील कर्मचार्याचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यास 70 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास बांधकाम साहित्याची जाळपोळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली. यासंदर्भात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता ते सर्वजण नक्षल समर्थक असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून नक्षल गणवेश, भरमार बंदुका व अन्य साहित्य ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.