नदी सुधार योजनेच्या कामाला अखेर मुहूर्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

पुणे शहरातील बहुचर्चित मुळा-मुठा नदी सुधार योजनेअंतर्गत शहरात निर्माण होणारे सांडपाणी १०० टक्के संकलित करण्यात येणार आहे. त्यासाठी मुळा-मुठा नदीच्या दोन्ही बाजूंना सुमारे ७० किलो मीटर लांबीची सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर या योजनेच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे.

शहरातील मुळा-मुठा नदी सुधारणेसाठी महत्त्वाकांक्षी जायका प्रकल्प राबविण्यात येत आहे. नदी सुधारणा योजनेअंतर्गत शहराच्या हद्दीत खडकवासला ते मुंढव्यादरम्यानच्या २७ किलोमीटरच्या नदीपात्राजवळ ११ नवे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार असून, चार पंपिंग स्टेशन्सही निर्माण होणार आहेत. नदीपात्रात सध्या थेट सांडपाणी सोडले जाते. त्याऐवजी सुमारे ७० किलोमीटरची सांडपाणी वाहिनी टाकली जाणार आहे. त्यात मैलापाणी व सांडपाण्याच्या वाहिन्या जोडून त्यावर प्रक्रिया करून ते पाणी नदीत सोडले जाणार आहे. यामुळे नदीचे होणारे प्रदूषण कमी होणार आहे. केंद्र शासनाने या प्रकल्पास जानेवारी २०१६मध्ये मान्यता दिली होती. त्यानंतर तब्बल २३ महिन्यांनी म्हणजेच डिसेंबर २०१७मध्ये या योजनेसाठी लंडनस्थित सल्लागार वंâपनीची नेमणूक केली आहे. मात्र, त्यानंतरही अद्यापि या योजनेच्या कामांच्या निविदा निघालेल्या नाहीत. तसेच कामही सुरू झालेले नाही.

या कामासाठी आतापर्यंत ६५ कोटींचा निधी आला असून, त्यातील ३० कोटींचा खर्च झाला आहे. या निधीतून २७ कोटींचे भूसंपादन आणि उर्वरित निधीतून बाणेर-बालेवाडी भागात ड्रेनेज टाकण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर आता प्रशासनाने या योजनेअंतर्गत उभारल्या जाणाऱ्या सर्व सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांना जोडणारी सांडपाणी वाहिनी टाकण्याच्या कामासाठी प्री-बिड काढली असल्याची माहिती महापालिकेच्या ड्रेनेज विभागाचे प्रमुख मदन आढारी यांनी दिली. हे काम सुमारे दोन वर्षांत पूर्ण केले जाणार असून, त्याअंतर्गत शहरातील नदीत येणारे सर्व सांडपाणी संकलित केले जाणार आहे. त्यात नाल्यांमधून येणाऱ्या पाण्याचाही समावेश असल्याचे आढारी यांनी स्पष्ट केले.