कोटबेल पाझर तलावाच्या अनधिकृत भिंतीवरून दोन गावांत तणाव

671
file photo

बागलाण तालुक्यातील कोटबेल येथे वनजमिनीच्या जागेवर बांधण्यात आलेल्या पाझर तलावातील पाण्याचा लाभ पुढील गावांना होत नाही. त्यातच कोटबेल ग्रामस्थांनी या पाझर तलावाला 25 मीटर लांब व 4 फूट उंच भिंत बांधून सुमारे 5 ते 6 गावांना गैरसोय निर्माण केली आहेत. सदरची भिंत वन विभागाच्या जागेवर बेकायदेशीर बांधण्यात आली असून ती तोडण्याची मुदत देऊन ही वन विभागाने दुर्लक्ष केल्याने आज 5 ते 6 गावातील ग्रामस्थांनी भिंत तोडावी यासाठी हल्लाबोल केला. मात्र भिंत कायम ठेवावी यासाठी समोरील 4 गावचे नागरिक आंदोलनास उतरल्याने कोटबेल येथे तणाव निर्माण झाला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी पोलीस कुमक मागविण्यात आली असून महसूल, वन, पोलीस विभाग प्रयत्नशील आहे.

कोटबेल येथील पाझर तलावाचे पुरपाणी कोटबेलसह उर्वरित गोराणे, आसखेडा, आखतवाडे, आंनदपूर, द्याने या पाच गावांना जात होते. मात्र सन 2002 मध्ये कोटबेलवासीयांनी अनधिकृत व बेकायदेशीरपणे 20 ते 25 मीटर लांब 4 फूट उंच भिंतींचे बांधकाम केले. परिणामी वरील गावांना वाहून जाणारे पूरपाणी सन 2002 पासून बंद झाले. तेव्हापासून कोटबेल, खिरमाणी, नळकस, कुपखेडा या चार गावांविरुद्ध गोराणे, आसखेडा, आखतवाडे, आनंदपूर, द्याने या दोघांत शीतयुद्ध सुरू झाले.

वन विभागाने अनधिकृत भिंत बांधकाम प्रकरणी सन 2002 मध्ये ग्रामस्थांवर गुन्हेदेखील दाखल केले. मात्र अद्यापपर्यंत काहीही झाले नाही. मध्यंतरीच्या काळात अनेक वेळा दोघा गावांमध्ये वादविवाद, तणाव निर्माण झालेत. मात्र वेळोवेळी त्यावर पुंकर घालण्यात आली. पाणीटंचाईच्या काळातदेखील मोठय़ा प्रमाणात पुढील गावांना झळ सोसावी लागली असताना त्या ग्रामस्थांनी शांतताच ठेवली.दरम्यान, प्रांत प्रवीण महाजन, तहसीलदार जितेंद्र पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश गुरव आदी उपस्थित आहेत.

तणावपूर्ण शांतता
यंदा जोरदार पाऊस झाल्याने पाझर तलावाची भिंत काढल्यास पाणी गोराणे, आसखेडा, आखतवाडे, द्याने, आनंदपूर गावांना सहज मिळेल यासाठी या ग्रामस्थांनी वन विभागाला दि. 14 ऑगस्ट 19पर्यंत मुदत देवून 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र 14 ऑगस्ट रोजी वन विभागाने पुढील 20 दिवसांची मुदत मागून घेत भिंत काढण्याचे आश्वासन दिले. मात्र काल 4 रोजी मुदत संपुष्टात येऊनही भिंत न काढल्याने आज उपरोक्त दहाही गावांतील ग्रामस्थ एकत्रित येत जनआंदोलन व प्रतिआंदोलन कोटबेले येथे सुरू केलेले आहे. कोटबेल ग्रामस्थांनी भिंत काढू नये यासाठी रस्त्यावर व पाण्याच्या टाकींवर चढून आंदोलन सुरू केलेले आहे. यामुळे या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या