पाकिस्तान पुन्हा 26/11 च्या प्रयत्नात, मुंबई पोलीस आयुक्तांचे वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी 2008 मध्ये केलेल्या हल्ल्याची जखम आजही ताजी आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांसह इसीस या दहशतवादी संघटनेचा देखील मुंबईसह हिंदुस्थानला धोका आहे. याच संदर्भात ”टाइम्स ऑफ इंडिया”शी बोलताना मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मुंबईला इसीसपेक्षाही पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासाठी सिद्ध राहण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.

पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल म्हणाले, ‘पाकिस्तानकडून मुंबईव 10 वर्षापूर्वी करण्यात आलेल्या 26/11 हल्ल्यासारखा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. त्यामुळे इसीसी या संघटनेपेक्षाही पाकिस्तानी दहशतवाद्यांचा धोका अधिक आहे. त्यामुळे याचा सामना करण्यासाठी सिद्ध राहण्याची आवश्यकता आहे.’ ते पुढे म्हणतात, ‘गेल्या 10 वर्षात मुंबई पोलिसांनी अशा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्यावर कठोर काम केले असून अनेक सुधारणाही केल्या आहेत. तसेच सुरक्षा एजन्सीसोबत समन्वय आणि गुपित माहिती एकमेकांना पुरवण्यावरही भर देण्यात आला आहे.’ 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 लोकांचा जीव गेला होता.

पाकिस्तान लश्कर-ए-तोएबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या मदतीने हिंदुस्थानात दहशतवादी हल्ला करून वातावरण बिघडवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. ते आजही हल्ला करण्यासाठी संधी शोधत आहेत. परंतु गेल्या 10 वर्षात आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी अधिक सज्ज झालो आहेत. आमच्या जवानांना, क्विक रिएक्शन टीमला अधिक चांगले प्रशिक्षण देण्यात आले आहे, तसेच सुरक्षा एजन्सींना मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची माहितीसह विविध बाबींवर चर्चा करत आहोत, असे जयस्वाल म्हणाले. तसेच आम्ही सातत्याने आमच्या क्षमता वाढवण्यास यासाठी प्राधान्य देत आहोत कारण दहशतवाद्यांचे नशिब एकदा जरी जोरावर असले तर त्यांचे काम होऊन जाते, परंतु आमचे नशिब 100 वेळा आम्हाला साथ देईल तेव्हा आम्ही यशस्वी होऊ, असे जयस्वाल म्हणाले.