गोरखनाथ मंदिरावरील हल्ला हा दहशतवादी कट, हल्लेखोराच्या लॅपटॉपमध्ये आढळली आक्षेपार्ह माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिरात रविवारी रात्री झालेला हल्ला हा दहशतवादी हल्ला होता असे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांक कुमार यांनी आज सांगितले. हल्लेखोर अहमद मुर्तझा अब्बासी याच्या लॅपटॉपमध्ये मिळालेल्या माहितीवरून गोरखनाथ मंदिरावरील हल्ला हा एक कट होता हे सिद्ध होते. दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि विशेष टास्क फोर्स (एसटीएफ) संयुक्तरित्या या हल्ल्याची चौकशी करत आहेत अशी माहिती कुमार यांनी दिली.

अहमद मुर्तझा अब्बासी याने 2015मध्ये आयआयटी मुंबईतून केमिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. रविवारी सायंकाळी सात वाजता तो गोरखनाथ मंदिराच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारावर पोहोचला. डय़ुटीवर तैनात असलेले पोलीस कर्मचारी गोविंद गौड आणि अनिल पासवान यांना त्याच्यावर संशय आला. त्याला तपासणीसाठी त्यांनी रोखले असता अब्बासीने आपल्याकडील धारदार शस्त्र बाहेर काढले. ‘अल्ला हू अकबर’ असा नारा देत गोरखनाथ मंदिराच्या पश्चिमेकडील द्वारापासून आतील परिसर आणि पोलीस ठाण्यापर्यंत 15 मिनिटे त्याने दहशत माजवली. मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांचीही त्याच्या भीतीने पळापळ झाली होती. ‘तुम्ही मला गोळ्या घाला’ असे तो पोलिसांना ओरडून सांगत होता. अब्बासी हा रविवारी सकाळीच मुंबईहून गोरखपूरला आला होता.

परदेशी कनेक्शनची चौकशी

एटीएसने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी अब्बासीच्या घरी जाऊन त्याचे वडील आणि कुटुंबातील अन्य सदस्यांचीही चौकशी केली. अब्बासीचे परदेशात कोणाशी कनेक्शन आहे का, त्याच्याकडे पासपोर्ट आहे का, तो कधी परदेशात गेला होता का, या दिशेनेही तपास सुरू आहे, असे विशेष पोलीस अधीक्षक डॉ. विपीन टाडा यांनी सांगितले. अब्बासी याने मोबाईल आणि लॅपटॉपवरून परदेशातील लोकांबरोबर संवाद साधला होता किंवा फंडिंग केले होते का याचाही शोध घेतला जात आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.