
‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही हे कळल्यावर आम्हाला आजिबात आश्चर्य वाटले नाही. कारण तो बाप बनणार असल्याने कसोटी मालिकेत खेळणार नाही याचा अंदाज आम्हाला आधीच आला होता, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉक्ली यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, विराट कोहली हा क्रिकेटविश्वातील एक महान खेळाडू आहे. त्याच्या गैरहजेरीत नक्कीच हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या कसोटी मालिकेची रंगत कमी होणार आहे.
मात्र विराट वन डे व टी-20 मालिका खेळणार आहे. एक कसोटी सामनाही तो खेळणार आहे. द्विपक्षीय मालिकेतील 10 पैकी 7 सामन्यांत कोहली खेळणार असल्याने आम्ही समाधानी आहोत. बाळाच्या जन्माच्या वेळी विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मासोबत राहणार असेल तर त्याच्या निर्णयाचा सन्मान व्हायलाच हवा. ‘टीम इंडिया’ आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ स्टार खेळाडूंनी सजलेले आहे. त्यामुळे गावसकर-बॉर्डर कसोटी मालिका नक्कीच रोमहर्षक हाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आर्थिक फटका बसणार
‘विराट कोहलीच्या गैरहजेरीत हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील रंगत नक्कीच कमी होईल. विराटची गैरहजेरी ही गोष्ट ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडणारी असली तरी आम्ही निराश आहोत. आधीच कोरोनामुळे क्रिकेटला मोठा फटका बसलेला आहे. त्यातच क्रिकेटविश्वातील महान फलंदाज एकच कसोटी सामना खेळणार असल्याने प्रक्षेपण करणाऱया वाहिनीलाही मोठा आर्थिक फटका बसणार आहे.’ – स्टीव्ह वॉ, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार
























































