‘बूमराहँ’ग झालं जी! दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 210 धावांत गुंडाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिकेला 76.3 षटकांत 210 धावांवर रोखून तिसऱया व निर्णायक कसोटी क्रिकेट सामन्यातील पहिल्या डावात 13 धावांची अल्पशी आघाडी घेण्यात यश मिळवले. एकटय़ा जसप्रीत बुमराहने 5 बळी टिपत यजमान संघाची फलंदाजी हँग केली. प्रत्युत्तरादाखल टीम इंडियाने उर्वरित 17 षटकांच्या खेळात 2 बाद 57 या धावसंख्येपर्यंत मजल मारली. दुसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा हिंदुस्थानकडे 70 धावांची आघाडी होती आणि कर्णधार विराट कोहली 14 तर चेतेश्वर पुजारा 9 धावांवर खेळत होते.

बुमराहची अप्रतिम गोलंदाजी

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसाच्या 1 बाद 17 धावसंख्येवरून बुधवारी पुढे खेळायला सुरुवात केली. जसप्रीत बुमराहने दुसऱयाच चेंडूवर एडेन मार्करमचा (8) अप्रतिम चेंडूवर ऑफ स्टंप उडवून हिंदुस्थानला सनसनाटी सुरुवात करून दिली. मंगळवारी ‘रात्रीचा रखवालदार’ म्हणून आलेल्या केशव महाराजने मात्र आज सकाळच्या सत्रात कसलेल्या फलंदाजाप्रमाणे 45 चेंडूंत 4 चौकारांसह 25 धावांची खेळी केली. त्याने बुमराह-शमी जोडीचा समर्थपणे सामना केला. बुमराहने अफलातून स्विंग गोलदाजीचे प्रदर्शन करत. 42 धांवात दक्षिण आफ्रिकेचे 5 फलंदाज बाद केले. त्यामुळे यजमानांचा पहिला डाव 210 धावांतच आटोपला.

किगन पीटरसनची झुंजार फलंदाजी

दक्षिण आफ्रिकेची 20.2 षटकांत 3 बाद 45 अशी स्थिती झालेली असताना किगन पीटरसनने फलंदाजीची सूत्रे हाती घेतली. रॅस्सी वॅन डेर डुसेन (21) व तेम्बा बावुमा (28) यांच्या साथीने त्याने धावफलक हलता ठेवला. पीटरसनने डुसेनच्या साथीने चौथ्या गडय़ासाठी 67 धावांची, तर बावुमाच्या साथीने पाचव्या गडय़ासाठी 47 धावांची भागीदारी केली. उमेश यादवने डुसेनला कोहलीकरवी झेलबाद केले, तर मोहम्मद शमीने बावुमालाही कोहलीकडेच झेल देण्यास भाग पाडले. शमीने बावुमाला बाद केल्यानंतर याच षटकात आलेल्या का¬इल वेरेने याला खातेही उघडू न देता यष्टीमागे पंतकरवी झेलबाद केले.

तळाच्या फलंदाजांचा प्रतिकार

वेरेनेच्या जागेवर आलेल्या मार्को जॅनसेनने 7 धावा केल्या, पण त्याने 26 चेंडूंचा सामना केला. शेवटी जसप्रीत बुमराहने त्रिफळा उडवून त्याला तंबूत धाडले. बुमराहने पुढच्याच षटकात पीटरसनला पुजाराकरवी झेलबाद करून हिंदुस्थानच्या मार्गातील प्रमुख अडसर दूर केला. पीटरसनने 166 चेंडूंत 9 चौकारांसह 72 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पीटरसन बाद झाल्यानंतरही कॅगिसो रबाडा (15), डुआन ऑलिवियर (10) व लुंगी एनगिडी (3) या तळाच्या फलंदाजांनी हिंदुस्थानी गोलंदाजांच्या 12 षटकांचा प्रतिकार केला.