
शिवसेना-‘मनसे’-राष्ट्रवादी युतीची प्रचंड जाहीर सभा रविवार, 11 जानेवारी रोजी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर होत आहे. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तोफा धडाडणार असून मुंबईच्या स्वाभिमानाचा हुंकार घुमणार आहे. मराठी अस्मितेची महाएकजूट या सभेत दिसणार असून मुंबईच्या रक्षणासाठी शिवगर्जनाच होणार आहे! सायंकाळी 5 वाजता ही सभा सुरू होईल.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान आणि मराठी माणसाची मुंबई उद्योगपती-धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा सत्ताधाऱयांचा डाव उधळून लावण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. या ऐतिहासिक युतीमुळे मराठी माणसाच्या मनामनात पुन्हा एकदा मराठी अस्मिता जागी झाली आहे. मुंबईद्वेष्टय़ांना त्यांची जागा दाखवण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. यातच युतीची घोषणा झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ‘मनसे’ प्रमुख राज ठाकरे जाहीर सभेच्या निमित्ताने मुंबईत पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने मुंबईकरांसह राजकीय विश्वाचे लक्ष या सभेकडे लागले आहे.
ठाकरे येताहेत..! ‘तुफान’ व्हायरल!!
सभेच्या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आलेला टीझर सोशल मीडियावर ‘तुफान’ व्हायरल झाला आहे. ‘ठाकरे येताहेत…’ अशा घोषणेनंतर… ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो..!’ अशी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची साद अंगावर शहारे आणणारी आहे. तर ‘आम्ही एकत्र आलोत मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी’ ही उद्धव ठाकरे यांची गर्जना आणि ‘मराठी माणूस पेटून उठतो तेव्हा काय होते हे राज्यकर्त्यांना कळेल!’ हा राज ठाकरे यांचा ‘आवाज’ मुंबईद्वेष्ट्यांना धडकी भरवणारा आहे. ‘हर हर महादेव’ असा जयघोष लाखोंचा जनसमुदाय या व्हिडीओत करताना दिसत आहे.
भगवे वादळ घोंगावणार
शिवतीर्थावर ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षांनी एकत्र येत असल्यामुळे शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून ठाकरेप्रेमींचे जथेच्या जथे मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे संपूर्ण मुंबईत भगवे वादळ घोंगावणार आहे.
स्थळ – छत्रपती शिवाजी महाराज मैदान
वेळ – सायंकाळी 5 वाजता


























































