
सामना प्रतिनिधी, मुंबई
बाळासाहेबांना सेन्सॉर कधीच नव्हता. त्यांची व्यंगचित्रे असो, भाषण असो किंवा त्यांचे लिखाण, त्यांना सेन्सॉरच्या कात्रीत कुणी अडकवू शकत नाही. हा ‘ठाकरे’ सिनेमा आहे, त्याला कोण बॅन करणार, असा खरमरीत सवाल शिवसेना नेते, खासदार आणि ‘ठाकरे’ सिनेमाचे निर्माता संजय राऊत यांनी केला. ठाकरे या नावाचा अर्थच गर्जना आणि ती गर्जना राहणारच. ते जसे होते तसेच क्रीनवर दिसणार. बाळासाहेबांना तेव्हा कुणी रोखू शकले नाही, आताही रोखू शकणार नाही, असा खणखणीत इशाराही संजय राऊत यांनी दिला.
बहुचर्चित ‘ठाकरे’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळय़ात निर्माता म्हणून आपल्या भावना व्यक्त करताना संजय राऊत म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी महान व्यक्ती इतिहासात पुनः पुन्हा जन्माला येत नाही. ते अमर हीरो होते. त्यांच्यासोबतचा माझा प्रवास रोमांचक होता.
‘ठाकरे’ सिनेमाचा ट्रेलर लाँचिंग सोहळा दणदणीत पार पडला. खास या ट्रेलरसाठी गर्दी झाली होतीच. पण थिएटरमध्ये सिनेमा पाहण्यासाठी येणाऱयांनीही इथे गर्दी केली. इतके भव्य लाँचिंग पाहून सगळ्यांचेच डोळे दिपून गेले आणि ‘ठाकरे’ सिनेमा आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला. ट्रेलर इतका धमाकेदार असेल तर सिनेमा कसा असेल याबद्दलच या गर्दीत चर्चा सुरू होती.
आयमॅक्स कार्निवलला भगवा साज
‘ठाकरे’ सिनेमाच्या ट्रेलर लाँचनिमित्त वडाळ्याच्या कार्निवल आयमॅक्स थिएटरला भगवा साज चढवण्यात आला. सर्वत्र भगवे झेंडे, भगव्या पताका, भगव्या कमानी चढवण्यात आल्या. सोहळ्याला येणाऱया पाहुण्यांचे भगवे फेटे, तुतारी आणि ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. थिएटरच्या प्रांगणात शिवसेनाप्रमुखांचे भव्य कटआऊट लावण्यात आले होते. प्रत्येक जण तिथे नतमस्तक होताना दिसत होते. त्याचप्रमाणे जवळच ‘ठाकरे’ सिनेमाचे भव्य होर्डिंग लावले गेले होते. थिएटरच्या प्रवेशद्वाराजवळ अभिवादन करणारे बाळासाहेबांचे आणखीही एक कटआऊट होते. त्यावर रुद्राक्षाच्या माळा लावण्यात आल्या होत्या. आत प्रवेश करताच छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि भव्य शिवमुद्रेचे दर्शन घडत होते. खुर्च्यावरही शिवसेनेच्या वाघाचे चित्र लावले होते.
एकच साहेब!
कार्निवल आयमॅक्स वडाळा थिएटरच्या प्रवेशद्वाराजवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. शिवसेनाप्रमुखांचा चष्मा, त्यांची भगवी आणि सफेद शाल, पाइप- लायटर आणि शिल्प ठेवण्यात आले होते. त्यामागे शिवसेनाप्रमुखांच्या कुंचल्यातून साकारलेल्या व्यंगचित्रांचे आकर्षक होर्डिंग लावण्यात आले होते. हे सर्व बघण्यासाठी आणि त्यांना मोबाईलमध्ये टिपण्यासाठी मोठी गर्दी झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सिनेमाच्या सर्व टीमनेही या दालनाला भेट दिली.
जगभरातील वृत्तवाहिन्यांकडून दखल
‘आता उठाओ लुंगी आणि बजाओ पुंगी’ असे म्हणत भूमिपुत्रांसाठी लढा उभारणाऱया हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अशाच दणकेबाज संवादांनी भरलेल्या ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर सुपरहिट झाला आहे. मराठी आणि हिंदीतील ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर काही तासांतच त्याला लाखो हिट्स मिळाले आहेत.
‘ठाकरे’च्या ट्रेलरवर मुंबई, महाराष्ट्र आणि देशाचेच नव्हे, तर जगाचे लक्ष लागून राहिले होते. आज आयमॅक्स, वडाळा येथे ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर काही वेळातच तो सोशल मीडियात धडकला. देशभरातील वृत्तवाहिन्यांनीही त्याची दखल घेतली. विविध वृत्तवाहिन्यांवर तो दाखवला गेला. हिंदी भाषेतील ट्रेलरमध्ये संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, मराठी चित्रपटांना थिएटर न मिळणे, बाबरी कांड, त्यानंतर मुंबईत भडकलेली जातीय दंगल आणि हिंदुस्थान-पाकिस्तानमधील क्रिकेट संबंध यावर भाष्य करण्यात आले आहे. मराठी ट्रेलरमध्ये दाक्षिणात्यांविरुद्ध शिवसेनेने छेडलेले आंदोलन, नोकऱयांमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य न देणाऱया एअर इंडियाविरुद्धचा एल्गार, मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे असे शिवसेनाप्रमुखांचे बेधडक वक्तृत्व यांचा समावेश आहे.


























































